मोर्चा आणण्याची वेळ आणू देवू नका

आमदार गणेश नाईक यांचा प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा

नवी मुंबई ः शहरात प्रदूषणामुळे नागरिक प्रचंड त्रासले आहेत. कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याचा धोका आहे. याप्रकरणी सोमवारी आ. गणेश नाईक यांनी माजी लोकप्रतिनिधी सह महापे कार्यालयावर धडक दिली. जर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण थांबविले नाही तर मंडळावर मोर्चा आणून जाब विचारू असा निर्वाणीचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे. 

गेल्या काही दिवसात नवी मुंबईचा श्‍वास एमआयडीसी भागातून होणार्‍या प्रदूषणामुळे कोंडतो आहे. घणसोली कोपरखैरणे, बोनकोडे ,खैरणे ,कोपरी, पावना ,तुर्भे वाशी, सानपाडा या भागात प्रकर्षाने आणि इतर सर्व भागात सकाळी आणि सायंकाळी वातावरणात दुर्गंधीयुक्त धूर पसरलेला असतो. प्रक्रिया न करता काही कंपन्या रासायनिक पाणी खाडीत सोडत असतात. ध्वनी प्रदूषणही वाढले आहे. आ. गणेश नाईक प्रदूषणप्रकरणी महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागील तीन आठवडे या विषयी पाठपुरावा करीत होते. आयुक्त बांगर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्रही दिले मात्र मंडळाकडून कार्यवाही झाली नाही. अखेर आ.नाईक यांनी माजी लोकप्रतिनिधी सह मंडळाच्या महापे कार्यालयावर धडक दिली. कोरोना हा श्‍वसनासंबंधी विकार आहे. फुफुसावर विपरीत परिणाम करतो. प्रदूषित वातावरणात या आजाराने बाधित नागरिकांची प्रकृती आणखी खालावू शकते असे सांगून त्यांनी वायू,जल आणि ध्वनी प्रदूषण करणार्‍या कंपन्यांची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला संकलित करण्यास सांगितले. गरज असेल तर या कामासाठी जादा अधिकारी नेमा असेही सुचवले. प्रदूषणकारी कंपन्यांची माहिती प्राप्त झाल्यावर त्यांना नोटीसा द्या. त्या नंतरही त्यांनी प्रदूषण करणे सुरूच ठेवले तर मात्र सरळ कोणतीही हयगय न करता या कंपन्या जनतेच्या व्यापक आरोग्य हितासाठी बंदच करा अशी मागणी केली. आ. गणेश नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे प्रदूषणकारी कंपन्या शोधून काढण्यासाठी अतिरिक्त अधिकारी नेमून या कंपन्यावर कारवाई करण्यात येईल असे प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या वरिष्ठ अधिकारी पाटील यांनी मान्य केले. पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात येवू तेव्हा प्रदूषण नियंत्रणात आणण्याची कार्यवाही झालेली असली पाहिजे अन्यथा पुढच्या भेटीत या प्रश्‍नी धडक मोर्चा आणण्याची वेळ आणू देवू नका असा इशाराच आमदार गणेश नाईक यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍याना दिला.