नवी मुंबईत अजून पडदा बंदच

नवी मुंबई : अनलॉक संदर्भातील नवीन नियमावली जाहीर करताना राज्य शासनाच्या माध्यमातून नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे लागणार असून, त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत. 

लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून सिनेमागृहे बंद होती. केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्याअनुषंगाने राज्य सरकारनेदेखील  50 टक्के क्षमतेने नियमांचे पालन करून 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे,  मल्टिप्लेक्स सुरू करण्यास परवानगी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने सिनेमागृह चालक, मालकांना शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालनासाठी नियोजन करावे लागणार आहे. कारवाईकडे सर्वांचे लक्ष सिनेमागृह सुरू करण्याच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कोणतीही पूर्वतयारी नसल्याने गुरुवारी नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, सीवूड भागातील सिनेमागृहे सुरू झाली नाहीत. स्वच्छता, 50 टक्के क्षमतेसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून सर्व नियमांचे पालन करणार असल्याचे सिनेमागृह चालकांनी सांगितले.