वीजमीटर खंडीत करालं तर खबरदार

आ. गणेश नाईक यांचा इशारा ; भाजपाचे हायव्होल्टेज आंदोलन

नवी मुंबई ः कोरोना काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजबीले तातडीने रदद करा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे करीत ग्राहकांचे वीजमिटर खंडीत करण्यासाठी आलात तर खबरदार, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिला आहे.

वाढीव वीजबीलांविरोधात भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यात सोमवारी जळजळीत आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई भाजपाच्या वतीने शहरात प्रत्येक नोडमध्ये हे आंदोलन पार पडले. वाशी सेक्टर 17 येथील महावितरण कार्यालयासमोर आ. नाईक यांच्या नेतृत्वाखाली हायव्होल्टेज आंदोलन झाले. ग्राहकांना महावितरणने वेळेवर बीले दिली नाहीत. चुकीच्या रिडिंगमुळे, वाढीव युनिटमुळे आणि वाढवलेल्या दरांमुळे बीलांची रक्कम गगनाला  भिडली. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली असताना मोठ्या रकमेची जाचक बीले जनता कशी भरणार? असा सवाल नाईक यांनी केला. वीजबीलांविरोधात जनतेचा संताप अनावर झाल्यानंतर वीजबीलात सवलत देण्याची घोषणा करणार्‍या ऊर्जामंत्री यांनी नंतर या आश्वासनांपासून घुमजाव केले. त्यामुळे या खोटारडया सरकारवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असे आ.नाईक म्हणाले. वीजबीले भरू न शकणार्‍या ग्राहकांचे मिटर खंडीत करण्याची कारवाई महावितरणने केली तर ती होवू देणार नाही, असे स्पष्ट करीत अशी कारवाई करण्यासाठी जर महावितरणचे कर्मचारी आले तर नागरिकांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.  

चुकीची व वाढीव बीले सुधारित करून परत द्यावीत, वीजबीलात सवलत द्यावी, वाढवलेले वीजदर कमी करावेत आणि ज्यांनी बीले भरली आहेत त्यांचे पैसे पुढील बीलात समायोजित करावेत, अशा मागण्या यावेळी आ. नाईक यांनी सरकारकडे केल्या. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढू, जनतेसाठी तुरूंगात जावे लागले तरी बेहत्तर, असा इशाराही दिला. आंदोलनकर्ते भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवून नंतर त्यांची सुटका केली.

या आंदोलनात माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, सुरज पाटील, डॉ जयाजी नाथ, संपत शेवाळे, नेत्रा शिर्के, अमित मेढकर, उषा भोईर, शशिकला पाटील, प्रकाश मोरे, प्रभाकर भोईर हे माजी नगरसेवक,  भाजपा जिल्हाउपाध्यक्ष जगन्नाथ जगताप, मारूती भोेईर, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुतार आदी मान्यवरांसह कार्यकर्त्यांंनी मोेठया संख्येने भाग घेतला.