‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ पहिली कार्यशाळा नवी मुंबईत

नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2020-2021’  हे अभियान 19 नोंव्हेंबर 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये देशातील 243 शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका देखील सहभागी आहे. सरकारमार्फत सहभागी शहरांमध्ये माहितीप्रद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे अभियानाची भारतातील पहिली कार्यशाळा नवी मुंबई महानगरपलिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. 4 ते 6 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार्‍या या कार्यशाळेचा आरंभ आज (5 जानेवारी) मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात करण्यात आला.

सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकची होणारी धोकादायक पध्दतीने माणसांकडून होणारी सफाई पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हे सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान राबविले जात असून याविषयी आधीपासूनच जागरूकतेने कार्यवाही करणारी नवी मुंबई महानगरपालिका विश्वासपूर्वक सहभागी झालेली आहे. या कार्यशाळेच्या प्रारंभी मनोगत व्यक्त करताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वच्छ सर्वेक्षणात नेहमीच आघाडीवर राहिलेली नवी मुंबई महानगरपालिका सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानामध्येही आघाडीवर राहील असा विश्वास व्यक्त केला. यावर्षीच्या सर्वेक्षणातील ‘निश्चय केला - नंबर पहिला’ हे उद्दिष्ट साध्य करताना स्वच्छतेचाच एक भाग असलेल्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंजमध्येही आपले नंबर वनचेच ध्येय राहील असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने यावर्षी सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान सुरू केले असून यामध्ये उत्तम कामगिरी करणार्‍या शहरांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. त्यामुळे या बाबत आधीपासूनच सतर्कतेने कार्यवाही करणारी नवी मुंबई महानगरपालिका या अभियानातील मानांकनासाठी सज्ज झालेली आहे. अभियानाच्या अनुषंगाने देशभरात आयोजित केल्या जाणार्‍या कार्यशाळांच्या शुभारंभाचा मानही नवी मुंबई महानगरपालिकेस लाभला आहे. सदर कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी मलवाहिन्यांच्या साफसफाईमध्ये हस्तक्षेप न करता ती यांत्रिकी मशीनव्दारे करण्याच्या दृष्टीने, मलवाहिनी व मशीन होल यांच्या साफसफाईसाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणांची माहिती देण्यात आली. साफसफाई करताना  सफाई मित्रांसाठी हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, युनिफॉर्म, फस्ट एड बॉक्स, गॅस मॉनिटर, ऑक्सिजन सिलेंडर, रिफेलेवटींग जॅकेट, टॉर्च अशा सुरक्षा साधन स्वरूपातील सेफ्टी किटची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले  तसेच मलनि:स्सारण विषयक काम करणार्‍या  सफाईकर्मींनी वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे सूचित करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये काम फाऊंडेशनचे संचालक एम.कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्मिता सिंग व प्रकल्प व्यवस्थापक अमित पांचाळ यांनी सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज या अभियानात अंतर्भूत असलेल्या मलनि:स्सारण वाहिन्यांची साफसफाई यांत्रिकी मशिनव्दारे करणेविषयी तसेच सुरक्षिततेविषयी विविध बाबींचे सादरीकरण करुन मार्गदर्शन केले.          नवी मुंबई महानगरपालिका मलनि:स्सारण विभागातील सर्व कनिष्ठ अभियंते तसेच 38 सफाईमित्र या प्रशिक्षणाप्रसंगी उपस्थित होते.