शेलारांकडे नवी मुंबईची जबाबदारी

मुंबई : भाजपने आगामी महापालिका निवडणुकांसाठी जबाबदारीचं वाटप केलं आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने महापालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली. त्यानुसार आशिष शेलार यांना नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समन्वय ठेवून पालिका निवडणुका जिंकण्याचे आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर आहे. 

येत्या काही दिवसात राज्यातील 5 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर होणार आहेत. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांसाठी भाजपने हुकमी मोहरे निवडले आहेत.  कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. तर औरंगाबाद मनपासाठी गिरीश महाजन हे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी शेखर इनामदार आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे प्रभारी म्हणून काम पाहतील. इतर महापालिका निवडणुकांसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. नवी मुंबईतही सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली असून महाविकास आघाडीचे संयुक्त कार्यक्रम व बैठका सुरू झालेल्या आहेत. भाजपानेही बैठका घेऊन रणनिती आखली असून जबाबदारी निश्‍चित केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणकीची तयारी करण्यासाठी आमदार आशीष शेलार यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली असून नाईक कुटुंबीयाला भाजपाची सर्व यंत्रणा मदत करणार आहे. नवी मुंबईत आमदार मंदा म्हात्रे व गणेश नाईक यांच्यातून विस्तव जात नाही. एका पक्षाचे आमदार असूनही शह काटशह राजकारण सरू आहे. त्यांना एकत्र घेऊन पालिका निवडणुकीत समन्वय साधण्याची मोठी कसरत शेलार यांना करावी लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील व शहरातील इतर पदाधिकारी होते. नाईक कुटुंबातील माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनाही पक्षात कोणतेही महत्त्वाचे पद नसताना बैठकीत स्थान देण्यात आले होते.

निवडणूक प्रमुख -गणेश नाईक
निवडणूक सहप्रमूख - मंदा म्हात्रे
किती जागांसाठी मतदान - 111