कचरा वर्गीकरण न केल्यास सोसायट्यांवर कारवाई

कचरा उचलणार नाही तसेच दंडात्मक वसूलीचा इशारा

नवी मुंबई ः देशात प्रथम क्रमांकाचे ध्येय नजरेसमोर ठेवताना नागरिकांचे 100 टक्के सहकार्य गरजेचे असून त्यांचे संपूर्ण सहकार्यच स्वच्छतेमध्ये 100 टक्के यश मिळवून देऊ शकते. नागरिकांनी घरातच कचरा ओला व सुका असा वेगवेगळा ठेवणे व तसाच वेगवेगळा देणे घनकचरा नियमानुसार अनिवार्य असून असे वर्गीकरण न करणार्‍या सोसायटी, वसाहती यांचा कचरा उचलला जाणार नाही असा स्पष्ट संदेश त्यांना दिला जावा, आणि तरीही सुधारणा न झाल्यास त्यांच्याकडून दंडात्मक वसूली करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.

स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने कचर्‍याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण केले जाणे व दररोज 50 किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणार्‍या सोसायट्या, वसाहती यांनी त्यांच्या आवारातच ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करणे या दोन महत्वाच्या गोष्टी असून त्याकरिता नागरिकांचे संपूर्ण योगदान अपेक्षित आहे. त्यादृष्टीने नागरिकांशी विविध माध्यमांतून सतत संवाद ठेवावा असे आयुक्तांनी सूचित केले. याकरिता कचरा वर्गीकरण व प्रक्रिया याविषयी सोसायट्यांमध्ये छोट्या स्वरुपात कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि त्यामधून नागरिकांना स्वच्छतेमध्ये त्यांची असलेली महत्वाची भूमिका सतत लक्षात आणून देणे गरजेच असून विभाग स्तरावरील सर्व अधिकार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सोसायट्यांना सातत्याने भेटी द्याव्यात व त्यांच्याशी संवाद साधून प्रबोधन करावे असे आयुक्तांनी सांगितले. या कामात एन.सी.सी.चे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य घ्यावे. तसेच याबाबतचा कृती आराखडा तयार करून आठवड्याभरात सादर करावा असे विभाग अधिकारी यांना सूचित करण्यात आले.

तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी ज्या सोसायटी, वसाहतीत राहतात तेथील कचरा वर्गीकरण व कचर्‍यावरील प्रक्रिया याची जबाबदारी त्यांनी घ्यावी असेही आयुक्तांनी सूचित केले. मोकळ्या जागांवरील डेब्रीजमुळे शहर अस्वच्छ दिसते. त्यामुळे त्या मोकळ्या जागा साफ करून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. अशाचप्रकारे रस्त्यांवर अनेक दिवस धूळ खात उभी असलेली बेकायदेशीर वाहने उचलण्याचेही निर्देश त्यांनी दिले. प्लास्टिकचा वापर होताना दिसला तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. अनधिकृत होर्डींगमुळे शहराचे विद्रुपीकरण होते हे लक्षात घेऊन संपूर्ण महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डींग हटाव मोहिम राबवावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या शहरात सुरू असलेल्या सुशोभिकरणाच्या कामांची नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे, मात्र त्यामुळे आत्मसंतुष्ट न होता अधिक चांगल्या व अभिनव संकल्पना राबवून सुशोभिकरण कामे करावीत अशाही सूचना त्यांनी केल्या. स्वच्छ सर्वेक्षण प्रमाणेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पंचतत्वांच्या अनुषंगाने इतर विषयांच्या सुविधांमधील सुधारणांकडे काळजीपूर्वक लक्ष देत त्यामध्येही वेगळी कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.