पालिका मुख्यालयात आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण

राष्ट्रीय बालिका सप्ताहानिमित्त महिला कोरोना योध्यांचा सन्मान

नवी मुंबई ः भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले व संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दल व अग्निशमन दलाचे जवान तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई शहराची ओळख मानल्या जाणार्‍या महानगरपालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीस तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तिरंगी रंगात झळाळणारे महापालिका मुख्यालय आणि देशातील उंच राष्ट्रध्वज स्तंभांपैकी एक असलेल्या महापलिका मुख्यालय इमारतीसमोरील 225 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील प्रतिकात्मक राष्ट्रध्वजासमवेत अनेक नागरिक हौसेने सेल्फी काढत आहेत. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात प्रथम क्रमांकाचा निर्धार केलेला असून आकर्षक अशा तिरंगी रांगोळीसमोरील ‘निश्चय केला-नंबर पहिला’ हे घोषवाक्य लक्षवेधी ठरत आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय बालिका सप्ताहानिमित्त कोव्हीड 19 विरोधातील लढ्यात समर्पित भावनेने काम करणार्‍या आरोग्य विभागातील सविता म्हामुनकर व दर्शिका भोईर तसेच स्वच्छतादूत   छाया पाटील, वंदना मुढे, सविता पडवळ यांना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.