लेखापालने केला 1 कोटी 15 लाखांचा अपहार

पनवेल : पनवेल मधील श्री महालक्ष्मी कृपा सर्व्हीस प्रा.लि. या कंपनीच्या अकाऊंटमध्ये आर्थिक गैरव्यवहार करुन तब्बल 1 कोटी 15 लाख 34 हजार रुपयांचा अपहार करुन फरार झालेल्या अकाऊंटंटला (लेखापाल) गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने कोल्हापुर येथून अटक केली आहे. प्रकाश पाटील असे या अकाऊंटंटचे नाव असून त्याने 2009 ते 2017 या कालावधीत कंपनीच्या अकाऊंटमध्ये गैरव्यवहार केल्याचे तपासात आढळुन आले आहे.

श्री महालक्ष्मी कृपा सर्व्हीसेस प्रा.लि. या कंपनीचे कार्यालय पनवेलच्या तक्का भागात असून या कंपनीकडून वेगवेगळ्या कंपन्यांना कामगार पुरविण्याचे काम केले जाते. 2009 मध्ये कंपनीने आरोपी प्रकाश पाटील याला अकाऊंटंट एक्झीक्युटीव्ह (लेखापाल) म्हणून नोकरीला ठेवले होते. त्यावेळी प्रकाश पाटील याच्याकडे कंपनीतील कामगारांचे पगार, उचल, फंड सर्व्हीस, भत्ता व इतर बँकेचे व्यवहार करण्याचे कामकाज देण्यात आले होते. मात्र प्रकाश पाटील याने कंपनीच्या अकाऊंटमध्ये गैरव्यवहार करुन कंपनीतील कामगारांच्या नावाने पगार, भत्ते, तसेच उचल या नावाखाली लाखो रुपयांची रक्कम आपल्या खात्यात तसेच आपल्या ओळखीतील व्यक्तीच्या खात्यात वळती करुन कंपनीचे लाखो रुपये हडप केले. दरम्यान, ही बाब कंपनीच्या संचालकांना समजल्यानंतर त्यांनी 2013 ते 2017 या वर्षातील कंपनीच्या व्यवहारांचे ऑडीट केले.

यात कंपनीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे आढळुन झाले. त्यामुळे कंपनीच्या संचालकांनी त्याबाबत प्रकाश पाटील याच्याकडे विचारणा केली असता, त्याने आर्थिक गैरव्यवहार करुन कंपनीच्या रक्कमेचा अपहार केल्याचे कबुल केले. तसेच अपहार केलेली रक्कम परत करण्याचे लेखी आश्‍वासन देऊन पलायन केले होते. मात्र दिलेल्या आश्‍वासनानुसार प्रकाश पाटील याने अपहार केलेली रक्कम कंपनीला परत न केल्याने कंपनीच्या संचालकांनी 2009 ते 2017 या कालावधीचे स्पेशल ऑडीट केले. या ऑडीटमध्ये प्रकाश पाटील याने कंपनीतील 1 कोटी 15 लाख 34 हजार रुपयांचा अपहार करुन कंपनीची आर्थीक फसवणुक केल्याचे आढळुन आले.

दोन वर्षे फरार असलेल्या आरोपी प्रकाश पाटील याचा कंपनीकडुन सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र, तो न सापडल्याने अखेर कंपनीच्या संचालकांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने आरोपी प्रकाश पाटील याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात फसवणुक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला. अखेर प्रकाश पाटील हा कोल्हापुर येथे असल्याची माहिती मिळाल्यांनतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या पथकाने आरोपी प्रकाश पाटील याला कोल्हापुर येथून अटक केली. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.