कोरोना काळातील मदतकार्यासाठी आ.गणेश नाईक यांचा पुरस्काररूपी गौरव

नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांना  दैनिक सकाळ सेवा सन्मान पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आमदार गणेश नाईक यांच्या वतीने माजी खासदार डॉ. संजीव  नाईक यांनी मुंबईत शनिवारी समारंभपूर्वक हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. 

कोरोना महामारीच्या संकटकाळात नवी मुंबईमध्ये मदतीचा महायज्ञ उभारून आमदार गणेश नाईक आजपर्यंत अविरत कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगराने साधलेल्या आजवरच्या लखलखीत विकासात मागील 25 वर्षे या शहराचे सत्ताधारी म्हणून त्यांच्या  दूरदर्शी ध्येय धोरणांचा निर्विवाद मोठा वाटा आहे. प्रगतीच्या बाबतीत नवी मुंबई शहराला महाराष्ट्राच्या आणि  देशाचाही नकाशावर मानाचे पान त्यांनी प्राप्त करून दिले आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात त्यांचा आधाररूपी कृतिशील विश्वास प्रत्येक नवी मुंबईकरांच्या प्रत्ययास आला. नवी मुंबई शहरात कोरोनाला प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी सहायभूत ठरलेले आमदार गणेश नाईक यांच्या या उल्लेखनीय आणि अनुकरणीय कोरोना काळातील मदत कार्याची सन्मानपूर्वक दखल घेत सकाळ सन्मान पुरस्कार 2021 प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.