कोरोना रुग्णसंख्येत वाढ

नवी मुंबई : रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली केल्यानंतर नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 1 ते 12 फेब्रुवारी दरम्यान मनपा क्षेत्रात 794 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापुर्वीच्या 12 दिवसामध्ये 713 जणांना कोरोना झाला होता. सरासरीपेक्षा 81 रुग्ण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. 

रेल्वे सेवा सुरू होण्यापुर्वी प्रतिदिन सरासरी 59 रुग्ण वाढत होते. लोकल सुरु झाल्यानंतर ही प्रमाणे प्रतिदिन सरासरी 66 झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात 435 रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेतला असता 15 जानेवारीला लोकल सेवा सुरू झाली त्या दिवशी अवघे 297 रुग्ण सापडले. त्यानंतरचे पहिले तीन दिवस अनुक्रमे 373, 325 आणि 228 रुग्ण सापडले होते. या तर आताच्या गेल्या काही दिवसांच्या रुग्णसंख्येचा विचार करता शुक्रवारी 290 रुग्ण आढळले असून फक्त दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्या आधी गुरुवारी 273, बुधवारी 364 रुग्ण सापडले होते. 9 फेब्रुवारीला 236 आणि 8 फेब्रुवारीला केवळ 200 रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत मृतांच्या संख्येचा विचार करता मृतांची संख्या अत्यल्प आढळली. यामुळे लोकल सेवा सुरू झाल्यापासून रुग्णसंख्या वाढल्याचे फारसे दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी झाला आहे. शुक्रवारी  पनवेल महापालिका हद्दील सर्वाधिक 30, पनवेल ग्रामीणमध्ये 5, पेण तालुक्यात 4 खालापूर तालुक्यात 3 आणि अलिबाग तालुक्यात एक रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील 554 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 62 हजार 606 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे, तर 60 हजार 360 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एक हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.