ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्गासाठी सिडको जमीन देणार

नवी मुंबई ः सिडकोतर्फे नवी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी नवी मुंबईतील दिघा येथील सर्व्हे क्र. 10, 566 चौ.मी. क्षेत्रफळाची आणि सर्व्हे क्र. 22, हिस्सा क्र. 1,2 (पी), 353 चौ.मी. क्षेत्रफळाची, अशी एकूण 919 चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. 

एमआरव्हीसीकडून सिडकोला 2018 मध्ये ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी दिघा येथील उपरोक्त जमीन हस्तांतरीत करण्याबाबतची विनंती करण्यात आली होती. सदर जमिनीकरिता कोणताही आराखडा तयार करण्यात आला नसून ती नॉन नोडल क्षेत्रामध्ये मोडत आहे. सदर जमिनीचा बहुतांशी भाग हा प्रादेशिक उद्यान क्षेत्रात (रिजनल पार्क झोन) आणि अल्प भाग हा निवासी क्षेत्रात आहे. एमआरव्हीसी हा केंद्र शासनाचा रेल्वे मंत्रालया अंतर्गत येणारा सार्वजनिक उपक्रम आहे. तसेच नवी मुंबई भूमी विनियोग (सुधारित) अधनियम, 2008 नुसार सिडकोकडून जाहीर निविदा किंवा लिलावाद्वारे भूखंडांची विक्री करण्यात येते. परंतु यास केंद्र शासन/राज्य शासन आणि त्यांचे उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वायत्त शासकीय संस्था यांचा अपवाद असून संबंधितांकडून अर्ज प्राप्त झाल्यावर भाडेपट्टा अधिमूल्याच्या दराने त्यांना भूखंड वाटपित करण्यात येतात.

या सर्व बाबींचा तसेच सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने दिघा येथील सदर 919 चौ.मी. क्षेत्रफळाची जमीन ही रु. 22,500 प्रती चौ.मी. या दराप्रमाणे दोन कोटी सहा लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे रुपये भाडेपट्टा अधिमूल्य आकारून 90 वर्षांच्या भाडेपट्ट्याने एमआरव्हीसीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपरोक्त दर हा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत वैध असून वाटप पत्र 31 मार्च 2021 पूर्वी दिले न गेल्यास सुधारित दर लागू होईल. भाडेपट्टा अधिमूल्याव्यतिरिक्त उर्वरित शुल्क, जीएसटी आणि वार्षिक भाडेही आकारण्यात येणार आहे. तसेच सदर जमिनीचा वापर हा केवळ ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या उभारणीकरिता करता येणार असून अन्य कोणत्याही उद्देशाकरिता करता येणार नाही. सदर बाब ही नवी मुंबई भूमी विनियोग (सुधारित) अधिनियम, 2008 मधील अधिनयमांच्या अधीन राहील.   

सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून सिडकोने हा निर्णय घेतला आहे. सदर रेल्वे मार्गामुळे ठाणे स्थानकावरील गर्दीचा भार कमी होण्यासह कल्याण दिशेकडून येणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुखकारक होण्यास निश्चितच मदत होणार आहे. 
डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको