आर.टी.ई प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्याची मनविसेची आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई ः आर. टी. ई प्रवेश प्रक्रिया सुरु असून यासाठी 21 मार्च पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. परंतु नियमानुसार प्रवेश होत नसल्याने मनविसेने पालिका आयुक्तांची भेट घेऊन शासननिर्णयानुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी केली आहे. शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनविसेने दिला आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानित व कायम अनुदानित शाळामध्ये किमान 25% टक्के प्रवेश ठेवण्याची तरतूद आहे. शासनाने जाहीर  केलेल्या वेळापत्रकानुसार 03 मार्च ते 21 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून मनविसेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व पालिकेच्या  गंभीर भूमिकेमुळे नवी मुंबई मध्ये आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना या योजनेचा फायदा झाला आहे. मात्र या योजनेचा योग्य तो प्रचार व प्रसार केल्यास नवी मुंबईतील आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील बालकांना अधिक फायदा होईल. नवी मुंबईतील काही मुजोर खाजगी शाळांनी शासनाच्या आरटीई अधिनियमांतर्गत 25% दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या योजनेला दर वर्षी हरताळ फासला आहे. नवी मुंबई शिक्षण मंडळाच्या बेजबाबदारपणामुळे या शासन निर्णयातील अनेक बाबींचे पालन केले नाही. या सर्व विषयांबाबत  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अत्यंत गंभीर असून शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन शिक्षण मंडळावर छेडण्यात येईल असा इशारा संदेश डोंगरे यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना दिला. सर्व मागण्यांवर सकारात्मक उत्तरे देऊन पुढील काही दिवसात योग्य ती कार्यवाही करून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे आयुक्तांनी आश्वासन दिले.