नागरिकांसाठी शाळेची मैदाने खुली न केल्यास होणार कारवाई

नवी मुंबई ः शहरातील अनेक शाळा शालेय कालावधीनंतर व साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करत नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. सिडको महामंडळाने शाळांसोबत केलेल्या करारान्वये शाळांना शालेय कालावधीनंतर व साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी शालेय मैदाने खुली करणे बंधनकारक आहे. ज्या शाळा या अटीचे उल्लंघन करतील अशा शाळांवर सिडकोतर्फे सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

सिडको महामंडळातर्फे शाळांसोबत केलेल्या करारनाम्यातील अट क्र. 3 (ड) अन्वये शालेय कालावधीनंतर तसेच साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेचे मैदान सामान्य नागरिकांना वापरायला देणे बंधनकारक आहे. परंतु अनेक शाळा ही अट पाळत नसल्याचे सिडको महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की एखादी शाळा जर सदर अट पाळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तर त्यांनी त्याबाबत सिडको महामंडळास माहिती द्यावी. त्याचप्रमाणे सिडको महामंडळातर्फे सर्व शाळांना देखील आवाहन करण्यात येत आहे की त्यांनीदेखील करारनाम्यातील अट क्र. 3 (ड) अन्वये शालेय कालावधी नंतर तसेच साप्ताहीक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शाळेचे मैदान सामान्य नागरिकांना वापरायला देण्यास तात्काळ सुरूवात करावयाची आहे. असे न केल्यास सिडको महामंडळाकडून अशा शाळांवर सक्तीची कारवाई करण्यात येणार आहे.