सोमवारपासून लसीकरण पुन्हा सुरु

नवी मुंबई : राज्यभरात लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन दिवस नवी मुंबईतही लसीकरण बंद झाले होते. राज्य शासनाकडून नवी मुंबई महापालिकेला सोमवारी ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या 20 हजार कुप्या प्राप्त झाल्याने सोमवारी दुपारपासून हे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पुन्हा सुरू झाले. आतापर्यंत महापालिका क्षेत्रात 1 लाख 44 हजार 459 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर पालिकेने शासनाकडे 2 लाख 50 हजार कोविशिल्ड व 75 हजार कोवॅक्सिन लस कुप्यांची मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती पालिका लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली. 

पालिकेची 23 नागरी आरोग्यकेंद्रे, वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालये, तुर्भे येथील माताबाल रुग्णालय, कामगार विमा रुग्णालयातील 1 जम्बो लसीकरण केंद्र तसेच खाजगी 22 रुग्णालयांत अशा एकूण 50 केंद्रावर सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शहरातील शासनाने मान्यता दिलेल्या विविध वयोगटातील अशा 4 लाख 50 हजार नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या नेरुळ फेज 1, नेरुळ फेज 2, नोसिल नाका व महापे या चार नागरी आरोग्य केंद्रांमध्येही सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आले आहे.  खासगी रुग्णालयात सोमवारपासून एमजीएम सीबीडी, न्यू मिलेनियम सानपाडा, क्रिटीकेअर  हॉस्पिटल ऐरोली व न्यू मानक नेरुळ रुग्णालयात नव्याने लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

आता महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली या तिन्ही रुग्णालयात दररोज 24 तास दिवसरात्र लसीकरण केंद्रे  सुरू आहेत. याशिवाय तुर्भे येथील रामतनु माता बाल रुग्णालय आणि 23 नागरी आरोग्य केंद्रे या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण सुरू आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 5 वाशी येथील कामगार विमा रुग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रात 4 बूथवर सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत दोन सत्रात लसीकरण सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे. ‘पालिका आवश्यकतेनुसार शासनाकडे लस मागणी करत असून आणखी मागणी केलेली लसही तात्काळ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून, लसीकरणात खंड पडणार नाही,’ असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.