सवलतींमुळे कडक निर्बंधांचे उल्लंघन

नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुरुवारी रात्री आठपासून अधिक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारपासून याचा परिणाम जाणवू लागला आहे. शहराबाहेर जाणार्‍या वाहनांची गर्दी शीव-पनवेल मार्गावर कळंबोली येथे दिसून आली. पोलीस सर्व वाहनांची चौकशी करत होते. रात्री शहरात रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत असला तरी दिवसभर मात्र बरेच व्यवहार, काही खाजगी आस्थापने शटर बंद करुन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. काही घटकांना देण्यात आलेल्या सवलंतींचा गैरफायदा इतर नागरिक घेत असल्याने शहरात कडक निर्बंधांचे योग्य ते पालन होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. 

शुक्रवारी कामोठे-कळंबोली-खारघर भागात नाकाबंदी करण्यात आल्याने परवानगी नसलेल्या वाहनचालकांना परत फिरावे लागत होते. त्यामुळे काही काळ गर्दी झाली होती.  नाकाबंदी करण्यात आली असली तरी शुक्रवारी अधिक कडक निर्बंधांचा पहिलाच दिवस असल्याने पोलीस सामंजस्याची भूमिका घेत होते. शहरातील सर्वच बाजारपेठा बंद दिसून येत होत्या. एपीएमसीवगळता कोठेही मोठ्या प्रमाणात पादचारी व वाहनांची वर्दळ दिसून आली नाही. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेकजण विनाकारण फिरतानाही दिसून येत आहेत. सकाळी 8 ते 11 दरम्यान दुकानात गर्दी दिसून येते. राज्य सरकारने सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर निर्बंध घातल्यानंतरही शुक्रवारी अनेकांनी लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. यासाठी काहींनी अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांच्या बनावट ओळखपत्राचा आधार घेत, तर काहींनी विनातिकीट प्रवासाचा प्रयत्न मध्य रेल्वेवर केल्याचे उघडकीस आले. ओळखपत्र व तिकीट पाहूनच प्रवाशांना स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात होता. याशिवाय स्थानकातील फलाट, पादचारी पुलांवरही तिकीट तपासनीस तैनात करण्यात आले होते. 

औद्योगिक वसाहती सुरू आणि अत्यावश्यक सेवेतील हॉटेल, किराणा यांमधून घरपोच वस्तू पुरवठा करणे या सर्व सवलतींमुळे शुक्रवारपासून सुरू झालेली संचारबंदी कठोरपणे राबविण्यात पोलिसांना अडथळा निर्माण झाला. पनवेल तालुक्यातील विविध सरकारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी पालिका व इतर अत्यावश्यक सेवेकरी वगळता इतर सेवेतील कर्मचार्‍यांना ये-जा करण्याची सवलत असल्याने नेमके कोणाला अडवावे, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये काम सुरू असल्याने तेथील कर्मचार्‍यांना ये-जा करता आली. इतर शहरांतूनही तीन पाळ्यांमध्ये कामगारांची ये-जा बससेवेमार्फत सुरू होती. तसेच शहरी भागांत सकाळच्या सत्रात अत्यावश्यक दुकाने सुरू असल्याने दुकानातील मालक व कामगारवर्गावर पोलिसांना कार्यवाही करणे अशक्य होत आहे.