तिसर्‍या लाटेसाठी वेळीच उपायोजना करा

आ. गणेश नाईक यांची पालिकेला सुचना ; मृत्यूदर कमी करून जीव वाचविण्यासाठी सतर्क रहा

नवी मुंबई ः आमदार गणेश नाईक यांनी मंगळवारी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याबरोबर झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक बैठकीत कोविड 19च्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी वेळीच उपायोजना करा अशी सुचना करीत दुसर्‍या लाटेत कोरोना रूग्णांचे मृत्यू वाढले असून ते थांबवून नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व काही सतर्क राहून करावे, अशी मागणी केली.

एप्रिल 2021 महिन्यात नवी मुंबईत 200 कोरोनाचे बळी गेले आहेत. याकडे लक्ष वेधत नाईक यांनी आजही रूग्णांना आयसीयू आणि व्हेंटीलेटरचे बेड मिळत नसल्याबददल तीव्र नाराजी व्यक्त केली. पाच ते सहा हजारांपर्यंत साधे बेड, ऑक्सिजनचे अडीच ते तीन हजारांपर्यत बेड, आयसीसूचे दीड ते दोन हजार, व्हेंटीलेटरचे दीड हजार बेड तयार ठेवा. पालिका अर्थसंकल्पातील जास्तीत जास्त रक्कम कोरोना नियंत्रणासाठी वापरावी, मागील काही दिवसांत रूग्णांचे आकडे जरी कमी झाले असले तरी मोठया संख्येने रूग्ण मरत आहेत. उपचार मिळाले नाहीत,औषधे उपलब्ध झाली नाहीत म्हणून रूग्ण दगावला असे होता कामा नये, असे निक्षून सांगितले. मध्यंतरीच्या काळात नागरी आरोग्य केंद्रे व रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आलेली कोरोना चाचणी केंद्रे पुन्हा सुरू करावीत, असा सल्लाही दिला. त्यावर सात हजार चाचण्या प्रतिदिन केल्या जातात त्या वाढविण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्त बांगर यांनी दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच नाईक यांनी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा करण्याची सुचना पालिकेला केली होती. मात्र त्यावर दुर्देवाने कार्यवाही झाली नाही. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनची वाढलेली मागणी पूर्ण करताना पालिका प्रशासनाची झालेली ओढातान पहाता पालिकेने स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प युध्द पातळीवर उभा करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणास सुरूवात झालेली आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अगोदरपासूनच सुरू आहे. लस घेणार्‍या नागरिकांची संख्या वाढल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी न होता ते सुरळीत होण्यासाठी प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र स्थापन करावे. जो प्रभाग भौगोलिकदृष्टया मोठा आहे त्यामध्ये दोन केंद्रे सुरू करावीत. कोरोनाच्या पुढील लाटांमध्ये बालकांना संसर्गाची भिती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे बालरोग विभाग तत्पर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. लसीची कमतरता निर्माण होवू नये यासाठी लस उत्पादक कंपन्यांबरोबर संपर्क करून लस खरेदी करावी. नवी मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे, या मागणीचा त्यांनी पुररूच्चार केला.

बेलापूर येथे 485 खाटांचे क्वारंटाईन सेंटर
सेक्टर 15 मयुरेश प्लॅनेट बेलापूर येथे महापालिका 485 बेडचे कोरोना विलगीकरण सेंटर सुरू करीत असून या सेंटरची आमदार गणेश नाईक यांनी पाहणी केली. नाईक यांच्या आवाहनानुसार समाजातून मदतीचे अनेक हात पुढे आले असून अशा नागरिकांचे आपण कौतुकच केले पाहिजे तसेच असे सांगत सर्वांनी कोरोनाला हरविण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन लोकनेते नाईक यांनी यावेळी केले.