पामबीच मार्गाच्या विस्तारीकरणासाठी सिडकोचा हातभार

सिडको आणि पालिका करणार 50:50 या प्रमाणात खर्च

नवी मुंबई ः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घणेसोली-ऐरोली पामबीच मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या मार्गासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकरिता 50 टक्के आर्थिक योगदान देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे लवकरच वाहतुक कोंडीवर मात करता येणार आहे. 

सिडकोतर्फे सीबीडी बेलापूर मार्गे ऐरोली ते मुलुंड-ठाणे-मुंबई यांना जोडणार्‍या 21.12 कि.मी. लांबीच्या पाम बीच मार्गाचे नियोजन करण्यात आले होते. अनेक लहान मोठे पूल उभारण्यात येऊन सदर मार्ग 2004 मध्ये कार्यान्वित झाला. पाम बीच मार्गामुळे शीव-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गांव्यतिरिक्त एक पर्यायी मार्ग सीबीडी बेलापूर ते ठाणे/मुंबई दरम्यानच्या वाहतुकीस उपलब्ध झाला. नियोजित पाम बीच मार्गापैकी 19.20 कि.मी. च्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून सीबीडी बेलापूर ते वाशी दरम्यान हा मार्ग पूर्णत: तर वाशी ते घणसोली दरम्यान अंशत: कार्यान्वित आहे. पूर्ण झालेला पाम बीच मार्ग नवी मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात आला असून संबंधित महानगरपालिकेकडून त्याची देखभाल करण्यात येते. सद्यस्थितीत पाम बीच मार्गाच्या वाशी ते ऐरोली दरम्यान 1.94 कि.मी. च्या टप्प्याचे काम अद्याप बाकी आहे. यामुळे पाम बीच मार्गावरून जाणार्‍या वाहनांना ऐरोली-मुलुंड पुलावर थेट प्रवेश उपलब्ध नाही. पाम बीच मार्गाचे एरोली ते घणसोली दरम्यानचे प्रस्तावित विस्तारीकरण हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रादेशिक संधानतेचाही (रिजनल कनेक्टिव्हिटी) एक भाग आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या अद्ययावत व्यापक परिवहन अभ्यासानुसार सदर संधानता हा ठाणे ते सानपाडा या किनारी मार्गाचा भाग आहे. पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाच्या खर्चाचा काही भार सिडकोने उचलावा, अशी विनंती नवी मुंबई महानगरपालिकेकडून सिडकोला करण्यात आली होती. त्यानुसार, सिडकोने 50:50 या प्रमाणात खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. सदर विस्तारीकरणाला रु. 250 कोटी इतका खर्च अंदाजित असून सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येकी रु. 125 कोटी खर्चाचा भार उचलणार आहेत. रस्ते आणि पूल उभारून पाम बीच मार्गाचा 1.94 कि.मी. चा हा विस्तारीत टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. पामबीच मार्गाच्या विस्तारीकरणामुळे ऐरोली आणि घणसोली दरम्यान अधिक सुलभ संधातना लाभणार आहे. या प्रकल्पामध्ये सिडको कमाल रु. 125 कोटींची गुंतवणूक करणार असून प्रकल्पाची किंमत वाढत गेली तरी सिडकोकडून या व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्चाचा भार उचलण्यात येणार नाही. सदर विस्तारीकरण प्रकल्पाकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेणे, आवश्यक त्या परवानग्या मिळवणे ही जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिकेची असणार आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सिडकोकडून नवी मुंबई महानगरपालिकेस प्रकल्प खर्चाचा निधी हस्तांतरीत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्प सिडकोतर्फे साकारण्यात येत आहे. 

पाम बीच मार्गाच्या घणसोली ते ऐरोली दरम्यान करण्यात येणार्‍या विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडीवर मात करण्यासह सीबीडी बेलापूर ते मुंबई व ठाणे दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ होऊन प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाला चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोने प्रकल्प खर्चाचा भार अंशत: उचलून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको