आगाऊ दंड भरतो मात्र मॉर्निंग वॉकला येणार...

सिडको अभियंत्याकडून नियमांची पायमल्ली ; कारवाईनंतर माफीनामा सादर

नवी मुंबई ः कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चेन आदेशानुसार 31 मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी असतानाही काही लोक मॉर्निग व इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडतात. बेलापुर येथील एका नागरिकाने वॉकसाठी आगाऊ पाच दिवसांची 5 हजार रुपये दंडात्मक रक्कम भरण्याची तयारी दर्शवली. या व्यक्तीवर पालिका आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे. यावर सदर व्यक्तीने लेखी माफीनामा लिहून दिला आहे. या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आलेली आहे. ही व्यक्ती सिडकोतील अभियंता विभागात कार्यरत असल्याचे समजते.

संचारबंदीत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे असून त्यावर महानगरपालिका आणि पोलीस विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये सकाळी व संध्याकाळी मॉर्निंग अथवा इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाईप्रमाणेच गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अशा वॉकच्या ठरावीक ठिकाणांवर अँन्टिजन टेस्टही करण्यात आलेल्या आहेत. संचारबंदीचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन हे दंडनीय आहे. यावर महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत लक्ष ठेवले जात आहे. पामबीच मार्गालगत सर्व्हीस रोडवर मॉर्निंग वॉक करणार्‍या एका व्यक्तीकडून नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पथकाने दंड आकारला असता सदर व्यक्तीने पुढील 5 दिवसाचीही दंडात्मक रक्कम भरतो, मात्र मॉर्निंग वॉकला येणार असे सांगितले. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करून त्याबाबतचे गांभीर्य नसणार्‍या बेलापूर विभागातील एका बेजबाबदार नागरिकाविरूध्द महानगरपालिका आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे. या व्यक्तीस एन.आर.आय. पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्यांना या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्याला बाधा पोहचत असल्याची जाणीव करून देण्यात आली. यावर सदर व्यक्तीने लेखी माफीनामा लिहून दिला आहे. या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आलेली आहे.