252 विद्यार्थ्यांनी घेतला विशेष लसीकरणाचा लाभ

पुन्हा 3 जून रोजी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन

नवी मुंबई ः परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांचे कोव्हीड लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे. त्यामुळे लसीकरणाअभावी अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये व त्यांची शैक्षणिक संधी वाया जाऊ नये याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

लसीकरण सत्राचा लाभ घेण्यासाठी सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात सकाळपासूनच परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थी युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली होती. संपूर्ण दिवसभरात 143 युवक व 109 युवती अशा 252 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेने आमची अडचण लक्षात घेऊन पुढाकार घेत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अजुनही काही विद्यार्थी माहिती न मिळाल्याने अथवा अन्य काही कारणामुळे आजच्या लसीकरण सत्रास येऊ शकले नसल्यास असे विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षणाच्या संधीपासून केवळ लसीकरण न झाल्याच्या कारणाने वंचित राहू नयेत याकरिता गुरूवार, 3 जून 2021 रोजी, सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत सेक्टर 15, नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय याठिकाणी पुन्हा विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.