कोरोनामुक्त झाल्यानंतरही म्युकरमायकोसिसबाबत काळजी घ्या

कोव्हीड टास्क फोर्सचे आवाहन

नवी मुंबई ः कोव्हीडमधून बरे झाल्यानंतर अनियंत्रित मधुमेह, कॅन्सर, किडनीचे विकार असलेल्या तसेच ज्यांना कोव्हीड उपचारादरम्यान स्टिरॉईड दिलेले आहे अशा व्यक्तींनी म्युकरमायकोसिस बाबत जागरूक रहावे व लक्षणे जाणवल्यास त्वरीत जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील म्युकरमायकोसिस ओपीडी मध्ये जाऊन विनामूल्य तपासणी करून घ्यावी. तसेच म्युकरमायकोसिसवरील काहीसे महागडे असलेले उपचार पालिकेच्या वतीने मोफत केले जात आहेत, त्यामुळे लक्षणे लपवू नयेत याविषयी लोकांच्या मनात विश्‍वास निर्माण करण्यासाठी अधिक व्यापक जनजागृती करावी अशी सूचना पालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्स सदस्यांनी केली.

महानगरपालिका क्षेत्रातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णस्थितीचा आढावा आणि उपचारपध्दती याविषयी विचार विनीमय करणेबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड टास्क फोर्सशी वेबसंवाद साधला. कोरोनामधून बरे झाल्यानंतर 6 ते 8 आठवडे म्युकरमायकोसिसबाबत काळजी घेण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरमार्फत 1 एप्रिलपासून रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या 9 हजाराहून अधिक कोरोनामुक्त व्यक्तींना दूरध्वनीव्दारे त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात आली आहे. त्यामधील म्युकरमायकोसिसची जोखीम असलेल्या 950 हून अधिक मधुमेही रुग्णांना दररोज फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात येत आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली.  त्यावर गृह विलगीकरणात राहून कोरोनामुक्त झालेल्या मधुमेही व किडनीचे विकार असलेल्या रुग्णांचीही काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत कोरोनाच्या लक्षणांबाबत तसेच महानगरपालिकेमार्फत तपासणी आणि उपचार मोफत आहेत याची माहिती पोहोचवावी अशी सूचना टास्क फोर्समार्फत करण्यात आली.

म्युकरमायकोसिसबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल माध्यमांप्रमाणेच शहरात ठिकठिकाणी मोठी होर्डींगही लावण्यात आलेली आहेत. त्यामध्ये वाढ करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे जनतेमध्ये म्युकरमायकोसिसची माहिती व त्याबाबत घ्यावयाची काळजी याची माहिती प्रसारित करण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्हिडिओ क्लिप्स तयार करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले.

यामध्ये खाजगी डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे अधोरेखीत करीत नागरिक आपल्या प्रकृतीबाबत सर्वप्रथम त्यांच्या जवळच्या खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधतात. त्यामुळे म्युकरमायकोसिसबाबत खाजगी डॉक्टरांची वेबिनारव्दारे कार्यशाळा आयोजित करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. रुग्णालयीन उपचारादरम्यान स्टिरॉईडच्या प्रमाणित वापराबाबतही डॉक्टरांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज टास्क फोर्सने व्यक्त केली.

नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे प्रमाण नियंत्रित असल्याबद्दल टास्क फोर्सच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र कायम जागरूकता राखून हे प्रमाण वाढणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केली. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात म्युकरमायकोसिसचे 19 रुग्ण उपचार घेत असून त्यामधील 10 रुग्ण हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील आहेत.