नवी मुंबई विमानतळाला जेआरडी टाटांचे नाव द्या

टाटांच्या नातेवाईकांच्या मागणीने वादाला नवे वळण

नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद प्रकल्पग्रस्त आणि शिवसेना यात चिघळला असताना, टाटा समुहाच्यावतीने देशातील विमान वाहतुकीचे जनक जेआरडी टाटा यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. टाटा समुहाच्या या मागणीमुळे नामांदरवादाने वेगवे वळण घेतले असून ठाकरे सरकार आणि केंद्र सरकार त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर टाटांचे नाव पुढे आल्याने दि.बांच्या नावाची मागणी लावून धरावी की टाटांच्या नावाला समर्थन द्यावे या द्विधा मनस्थीतीत प्रकल्पग्रस्त सापडले आहेत. 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावरुन सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव पारित करुन राज्य शासनाकडे पाठवला आहे. हा ठराव पारित होताच प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. याबाबत आंदोलनाचा पवित्राही प्रकल्पग्रस्तांनी घेतला असून दि.बांच्या समर्थनार्थ मानवी साखळी उभारली होती. प्रकल्पग्रस्त नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता त्यांनी नाव बदलण्यास असहमती दर्शवल्याने चर्चेची फेरी फुकट गेल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे. त्यातच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव देण्यात येणार असल्याचे ठणकावून सांगितल्याने प्रकल्पग्रस्तांनी सिडकोला घेराव घालण्याचे निश्‍चित केले आहे. 

दरम्यान, टाटा समुहाच्या वतीने या नवीन हरित विमानतळास देशाचे विमान वाहतुकीचे जनक जेआरडी टाटा यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. जेआरडी टाटा यांनी देशात सर्वप्रथम विमान वाहतूक सुरु केली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी त्याचे राष्ट्रीयकरण केल्यावर हसत हसत ही विमानवाहतुक कंपनी राष्ट्राच्या स्वाधीन केली. आज ही वाहतुक कंपनी एअर इंडियाच्या नावाने ओळखली जाते. जगभरात त्या-त्या देशातील विमानवाहतुकीच्या जनकांचे नाव अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळांना दिल्याचे टाटा समुहाच्यावतीने सांगण्यात आले आहे. भारतातही विमानतळाची नावे आतापर्यंत माजी पंतप्रधान किंवा स्वातंत्र्यसेनानींच्या नावाने ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ, हैदराबादचे राजू गांधी विमानतळ, वारणसीचे लालबहादुर शास्त्री, लखनऊचे चरणसिंग आणि झारखंडमधील देवघर येथील विमानतळाचे नाव अटल बिहारी वाजपेयी  यांच्या नावाने ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर अहमदाबाद विमानतळाला सरदार पटेल, अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथील विमानतळाला वीर सावरकर, कलकत्ता येथील विमानतळाला सुभाषचंद्र बोस, नागपुर येथील विमानतळाला बाबासाहेब आंबेडकर, रांची येथील विमानतळाला बिरसा मुंडा तर इंदौर येथील विमानतळाला अहिल्याबाई होळकर या स्वातंत्र्यविरांची नावे देण्यात आली आहेत. त्याचबरोबर मुंबई येथील विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज तर बेंगलौर विमानतळाला विजयानगरचे राजे केमपे गौडा आणि जयपुर विमानतळाला महाराणा प्रताप या महाराजांची नावे देण्यात आली आहेत. भारतात कोणत्याही विमानतळाला देशात पहिली विमानसेवा सुरु करणार्‍या जेआरडी टाटा यांचे नाव देण्यात आलेले नाही याबाबत टाटा समुहाने खेद व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे  ग्रीनफिल्ड विमानतळ असून या विमानतळाला जेआरडी टाटा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी टाटांच्या नातेवाईकांनी केल्याने आता नामांतर वादाने वेगळे वळण घेतले आहे. टाटा समुहाने देशाची खुप मोठी सेवा केली असून कोविड काळात देशाच्या व राज्याच्या मदतीला टाटा समुह धावून आला आहे. टाटा या नावाला देशात प्रचंड आदर असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त कसा प्रतिसाद देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

नवी मुंबई विमानतळाची मालकी अदानी समुहाकडे
विमानतळाचे जीव्हीके कंपनीकडे असलेले सर्व अधिकार अदानी समूहाकडे हस्तांतरित झाले असल्यामुळे  प्रस्तावित विमानतळाचा 74 टक्के भागधारक म्हणून अदानी समूहाच्या मालकी हक्कावर सिडकोने शिक्कामोर्तब केले आहे. सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावानुसार 26 टक्के हिस्सा सिडकोकडे राहणार आहे. सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता हा प्रस्ताव प्रोजेक्ट मॉनिटरिंग अँड इम्प्लिमेंटेशन कमिटी व सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. 

जीव्हीके कंपनीची मालकी ही अदानी समुहाकडे शेअर्स वर्गीकरणाच्या माध्यमातून आली आहे. केंद्र सरकारने त्याला मंजूरी दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकी अद्याप अदानी समुहाला देण्यास सिडकोने मंजुरी दिलेली नाही. सदर बाब प्रक्रियाधीन आहे. - गिता पिल्लाई, सिडको अधिकारी