कॉरी क्षेत्रातील कामगारांचे लसीकरण

नवी मुंबई ः लसीकरणापासून कोणीही नागरिक वंचित राहू नये याची विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये कॉरी क्षेत्रात काम करणारे व तेथेच राहणारे कामगार व त्यांचे लसीकरणासाठी प्रमाणित वयातील कुटुंबिय यांच्याही लसीकरणाकडे काळजीपूर्वक लक्ष देत तुर्भे विभागात इंदिरानगर परिसरातील डि.वाय.पाटील कॉरी आणि चुनाभट्टी कॉरी परिसरातील 25 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. आता त्याच परिसरातील रिकोंडा, चेतक स्टोन, बबनशेट, राजलक्ष्मी, साई स्टोन या कॉरी परिसरातील कामगारांचेही लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

आधीच्या 34 लसीकरण केंद्रांमध्ये 17 जूनपासून 22 शाळांमधील लसीकरण केंद्रांची भर घालण्यात आलेली असून उर्वरित शाळांमध्येही येत्या एक ते दोन दिवसात लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.   कोव्हीड 19 लसीकरणापासून कोणताही घटक वंचित राहू नये याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण काळजी घेतली जात असून रस्त्यांवरील बेघर, निराधारांचेही लसीकरण करण्याचे नियोजन केले जात आहे.