पावसाळ्यात मदतकार्याकरिता सज्ज रहा

आयुक्तांचे सर्व विभाग अभियंत्यांना आदेश ; पावसाळी कामांचा आढावा

नवी मुंबई ः संपूर्ण पावसाळा कालावधीत कायम सतर्क रहावे तसेच वेधशाळेमार्फत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असेल किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असे जाणवल्यास आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन संबंधित यंत्रणेसह मदतकार्याकरिता सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व अभियंत्यांना दिले. पावसाळी परिस्थितीतील व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आयुक्तांनी शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत विशेष बैठक घेत पावसाळ्याच्या अनुषंगाने केलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.  

दोन वेळा मोठ्या प्रमाणात झालेल्या पर्जन्यवृष्टीतील अनुभवांच्या आधारे जेथे पाणी साचण्याच्या अडचणी जाणवल्या अशा ठिकाणांवर तातडीने आवश्यक उपाययोजना करून घ्याव्यात असे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले. अतिवृष्टी आणि भरतीची वेळ एकच आल्यास शहरातील सखल भागात पाणी साचते हे लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अंडरपास तसेच इतर सखल ठिकाणी पंपांमध्ये वाढ करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. तसेच ते पंप विनाअडथळा कार्यान्वित रहावेत याकरिता बॅकअप ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले. नाल्यांच्या प्रवाहात व कल्व्हर्टखाली साचणारा गाळ काढण्याची कार्यवाही पावसाळा कालावधीत सातत्याने सुरू राहिली पाहिजे याची दक्षता घेण्यात यावी तसेच गाळ साचत असेल  तर तो वेळोवेळी लगेच काढला जाईल आणि पाणी साचणार नाही याबाबत सतर्क राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही असे स्पष्ट करीत आयुक्तांनी एखाद्या ठिकाणी खड्डा पडत असल्याचे लक्षात आल्यास तो मोठा होण्यापूर्वीच त्याची तातडीने डागडुजी करून घ्यावी अन्यथा जबाबदारी निश्चित करून कारवाईला सामोरे जावे लागेल याचा पुनरोच्चार केला. अतिक्रमणामुळे कोठेही नैसर्गिक नाल्यांतील वाहत्या पाण्याला अडथळा होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे सूचित केले.

पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या प्राप्त होणार्‍या तक्रारींच्या अनुषंगाने आयुक्तांनी मोरबे धरण प्रकल्पापासून शहरातील नागरिकांपर्यंत पोहचत असलेल्या पाणीपुरवठा प्रक्रियेचा बारकाईने आढावा घेतला. यामध्ये शहरातील उत्तरेकडील भागात एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा उपलब्ध करून घेतला जात असून या दोन महिन्यांत एमआयडीसी मार्फत 6 वेळा शटडाऊन घेण्यात आल्याने सर्व नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा यादृष्टीने पाण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली. या अनुषंगाने पाणीपुरवठ्याबाबत येणार्‍या अडचणींची माहिती नागरिकांपर्यंत व्यापक स्वरूपात पोहचवावी असे सूचित केले. 

सर्वांनी एकजुटीने कार्यवाही करा
पावसाळी कालावधीत सतर्कता व पाऊस पडू लागल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उभे राहून मदतकार्यासाठी तत्परता या दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या असून नागरिकांना दिलासा देण्याचे काम हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यादृष्टीने महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी एकजुटीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश आढावा बैठकीत देण्यात आले.
  • अभियंत्यांना केलेल्या सूचना
    रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत हलगर्जीपणा चालणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
    पाणी साचण्याच्या सखल भागात पंपामध्ये वाढ करण्याच्या सूचना
    नाल्यांच्या प्रवाहातील गाळ काढण्याची कार्यवाही पावसाळा कालावधीत सातत्याने सुरु राहण्याची दक्षता घेण्याचे निर्देश
    पाणीपुरवठ्याबाबत येणार्‍या अडचणींची माहिती नागरिकांपर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहचवावी.