65937 जणांकडून 3 कोटीहून अधिक दंड वसूल

कोव्हिड नियमांचे उल्लंघन ; दक्षता पथकांनी एका महिन्यात वसूल केला 21 लाखाहून अधिक दंड  

नवी मुंबई ः विशेष दक्षता पथकांकडून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिक / आस्थापना यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणार्‍या 65937 व्यक्ती व आस्थापनांकडून 3 कोटीहून अधिक रक्कमेची दंड वसूली पालिकेकडून करण्यात आली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5 जून ते 4 जुलै 2021 या एका महिन्याच्या कालावधीत 4312 नागरिक / आस्थापना यांच्यावर प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 21 लक्ष 30 हजार 550 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरिता दक्षता पथकांव्दारे नियंत्रण राखत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन केल्यामुळे एकूण 65937 नागरिक / आस्थापना यांच्यावर कारवाई करीत रु. 3 कोटी 2 लक्ष 80 हजार 650 इतक्या दंडात्मक रक्कमेची वसूली करण्यात आलेली आहे. कोव्हीडच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव मागील आठवड्यापासून काहीसा स्थिरावलेला दिसत असून नवी मुंबई महानगरपालिकेने दैनंदिन टेस्टींगची संख्या कमी न करता 6000 पेक्षा अधिक ठेवलेली आहे. तसेच कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारीही गतीमानतेने सुरु केलेली आहे. लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे याकडेही लक्ष देत लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसेच विविध सेवा पुरविताना कोव्हीडदृष्ट्या संभाव्य जोखमीच्या व्यक्तींच्या लसीकरणाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचप्रमाणे कॉरी क्षेत्रातील मजूर, रेडलाईट एरिआ, बेघर निराधार अशा दुर्लक्षित घटकांचेही लसीकरण करून घेतले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 5 लक्ष 70 हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. 

विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत दक्षता पथकांप्रमाणेच प्रत्येक पथकात 5 कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या 31 विशेष दक्षता पथकांकडून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिक / आस्थापना यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांकडून दंड वसूली हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट नसून आपल्या बेजबाबदार वर्तनाने सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणार्‍यांना या दंडात्मक कारवाईव्दारे समज मिळावी ही यामागील भूमिका असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.