मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

नवी मुंबईः मोठ्या रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी असणार्‍या थकबाकीदारांना मालमत्ता जप्ती / लिलाव यांची नोटीस बजावूनही 21 दिवसांच्या नोटीस कालावधीत दखल न घेणार्‍या थकबाकीदारांविरोधात करावयाच्या पुढील कायदेशीर कार्यवाहीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ताकर विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. मालमत्ता कर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले आणि विभागातील सर्व अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मालमत्ताकर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असून त्यामधूनच नागरी सोयीसुविधांची पूर्तता करण्यात येते. अनेक नागरिक प्रामाणिकपणे आपला मालमत्ताकर नियमित भरत असतात. तथापि मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करून व त्यास मुदतवाढ देऊनही त्या सवलतीचा लाभ न घेणार्‍या व त्यानंतर पुढील जप्ती / लिलाव कार्यवाहीची नोटीस बजावूनही त्याची दखल न घेणार्‍या थकबाकीदारांना मालमत्ताकर भरणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी नोटीस कालावधी पूर्ण झालेल्या थकबाकीदारांविरोधात कारवाई हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. या आर्थिक वर्षात 163 कोटी इतकी मालमत्ताकर वसूली झालेली असून त्यावर समाधान न मानता उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सतत पाठपुरावा करावा आणि अधिक गतीमानतेने काम करावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. मोठ्या रक्कमेची थकबाकी असणार्‍या 31 मार्च 2021 पूर्वीच्या 26 मालमत्ता कर थकबाकीदारांना 1 ते 15 जून या कालावधीत मालमत्ता जप्ती / लिलावाच्या नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 16 जून ते 2 जुलै कालावधीत 49 थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यानंतर 3 ते 15 जुलै 2021 या कालावधीत आणखी 53 थकबाकीदारांवर जप्ती / लिलावाची नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बेलापूर विभागातील 3 मालमत्ता, नेरुळ विभागातील 9 मालमत्ता, वाशी विभागातील 6 मालमत्ता, तुर्भे विभागातील 9 मालमत्ता, कोपरखैरणे विभागातील 11 मालमत्ता व घणसोली विभागातील 8 मालमत्ता व ऐरोली विभागातील 7 मालमत्तांचा समावेश आहे. या 53 मालमत्ता धारकांची 75 कोटी 96 लाखाहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत 128 मालमत्ताकर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत. त्यातील नोटीस मुदत संपलेल्या थकबाकीदारांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.