मोरबे धरणाचा पाणीसाठा 62 टक्क्यांवर

नवी मुंबई ः नवी मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात एक दिवसात 226 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसापासून धरण क्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसाने मोरबे धरणाची पाणी पातळी 1.48 मीटरने वाढून ती 80 मीटर इतकी होवून धरणातील पाणीसाठा 62% टक्के झाला आहे. 

गत आठवड्यापर्यंत मोरबे धरणाची पातळी 42 टक्के होती. त्यामुळे यंदा नरी मुंबईगा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिंता व्यक्त होत होती. मात्र आता दमदार पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढली आहे. सध्यस्थितीत धरणात झालेला पाणीसाठा व येत्या काही दिवसांत पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच धरण भरून वाहू लागेल, असा विश्वास आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केला. 19 व 20 जुलै या दोन दिवसांत धरण क्षेत्रात सव्वा दोनशे मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याने धरणाची पाणी पातळी 1.48 मीटरने वाढून ती 80 मीटर इतकी झाली आहे. त्यामुळे धरणात सध्या 62 टक्के इतका पाणीसाठा झाला असून या उपलब्ध साठ्यातून 31 जानेवारी 2020 पर्यंत शहराला पाणीपुरवठा करता येईल, असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आयुक्तांनी केलं आहे.

  • गतवर्षीच्या तुलनेत यावेळी जास्त पाणीसाठा 
  • यावर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. मात्र जुलैपासून पावसाने दमदार एन्ट्री केल्यामुळे गतवर्षीच्या जुलै महिन्यातील तुलनेत यावेळी जुलै महिन्यातच मोरबे धरणात पाणीसाठा वाढला असून अजून काही दिवस पाऊस असाच पडत राहिला तर मोरबे धरण लवकरच भरून वाहू लागेल. दरम्यान, यंदाच्या चालु वर्षात मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत मोरबे धरणात 44 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यात सध्यस्थितीत धरणात जोरदार पर्जन्य झाल्यामुळे हा साठा आता 62 टक्के इतका झाला आहे.