लाच प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड

      नवी मुंबई : लाच प्रकरणी नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला एसीबीच्या पथकाने गजाआड केलं आहे. पान मसाला विक्रीचा व्यवसाय सुरु ठेवण्याकरिता 32 हजार 500 रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) नवी मुंबई मालमत्ता आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रामदास छापरिया आणि पोलीस हवालदार इकबाल बशीर शेख या दोघांना रंगेहात पकडले.

छापरिया यांच्यासाठी 25 हजार आणि स्वतः साठी 7 हजार 500 रुपयांची मागणी शेख याने केली होती. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी नवी मुंबईत करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. अटक केलेल्या दोघांनी तक्रारदारांकडे 40 हजारांची मागणी केली होती. त्यातच, तडजोडी अंती 32 हजार 500 रुपये देण्याचे ठरले. बुधवारी याप्रकरणी तक्रारदारांनी ठाणे एसीबी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, गुरुवारी याप्रकरणी पडताळणीही करण्यात आली. तसेच, लाचेची मागणी करत ती स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

लाचेची ही रक्कम एसीबीने हस्तगत केली असून त्या दोघांविरोधात नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या दोघांना अटक केल्याची माहिती ठाणे एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.