रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई ः सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग,  वी मुंबई आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 13 ऑगस्ट रोजी कोंकण भवन येथील दुसर्‍या मजल्यावर असलेल्या महिला भोजन कक्षामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ महाराष्ट्र नगर रचना विभागाचे संचालक सुधाकर नांगनुरे यांच्याहस्ते झाला. 

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सध्या कर्करोगाने बाधित रुग्णांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच कोविड-19 या संसर्गजन्य रोगाने बाधित रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. या अनुषंगाने  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोंकण भवन व परिसरातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तसेच नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने रक्तदान करुन या शिबिरात सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिर आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या रक्तपेढीने  या उपक्रमास उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सहसंचालक नगर रचना कोंकण विभाग,जितेंद्र भोपळे, नगर रचनाकार राजेंद्र चव्हाण, कोंकण भवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्वप्रथम रक्तदान करुन या शिबिराला सुरुवात केली. यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटल परळ शाखेतून आलेल्या सर्व रक्त संक्रमण अधिकारी व कर्मचार्‍यांचे सहसंचालक, नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी शिबिरासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवा व सहयोगाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.