श्रीगणेशोत्सवासाठी पालिकेसह पोलीस विभाग सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 06, 2021
- 478
कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करून गणेशोत्सव आरोग्योत्सव साजरा करण्याचे आवाहन
नवी मुंबई ः कोव्हीड 19 च्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा श्रीगणेशोत्सव शासनाने निर्गमित केलेल्या कोव्हीड सुरक्षा नियमावलीच्या कक्षेत काटेकोरपणे साजरा व्हावा तसेच कुठेही गर्दी होणार नाही याकडे महापालिका व पोलीस विभागाने परस्पर समन्वयाने बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी श्रीगणेशोत्सव 2021 बाबतच्या पूर्वतयारी आढावा बैठकीप्रसंगी दिले.
शानाच्या नियमावलीनुसार श्रीगणेमूर्तींची उंची ही सार्वजनिक उत्सवाकरिता 4 फूट व घरगुती उत्सवाकरिता 2 फूटांपर्यंत असावी असे सूचित करण्यात आले असून त्याविषयी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी तसेच नागरिकांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे तसेच मूर्तीकारांनाही त्याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. तथापि या अनुषंगाने पुन्हा एकवार सर्व मंडळे तसेच मूर्तीकारांना माहिती देण्यात यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप उभारणी करण्यासाठी मंडळांना आवश्यक परवानगी मिळणे सोयीचे जावे याकरिता 24 जुलैपासूनच वेबपोर्टलवर विशेष सुविधा निर्माण करून देण्यात आली होती. त्यामध्ये अखेरच्या 31 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत 133 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 120 मंडळांनी अर्जासह सर्व कागदपत्रे जोडल्याने त्यांना मंडप उभारणी परवानगी देण्यात आलेली आहे.
मागील वर्षी श्रीगणेशोत्सवानंतरच कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली होती या बाबीकडे विशेष लक्ष वेधत आयुक्तांनी त्यादृष्टीने विभाग कार्यालयांनी सतर्क रहावे व याकामी कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही असे स्पष्ट केले. श्रीगणेशोत्सवामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम राबवून श्रीगणेशोत्सव आरोग्यत्सव स्वरूपात साजरा करण्याविषयी मंडळांना प्रोत्साहीत करावे व त्यादृष्टीने प्रसिध्दी करावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे तसेच मास्कचा वापर अनिवार्य असणे या महत्वाच्या गोष्टी असल्याचे सांगत आयुक्तांनी श्रीगणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीत कमी व्यक्ती त्याठिकाणी येतील हे पहावे व तशा प्रकारच्या सूचना नागरिकांप्रमाणेच गणेशमूर्ती विक्रेत्यांनाही द्याव्यात असे सूचित केले. विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने मागील वर्षी 22 पारंपारिक मुख्य विसर्जन स्थळांच्या जोडीला एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची सर्व विभागांमध्ये निर्मिती करण्यात आली होती. या संकल्पनेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या विसर्जनाचा आढावा घेऊन यावर्षी नागरिकांना अधिक सोयीचे होईल अशा नवीन 21 कृत्रिम तलावांची वाढ करीत एकूण 156 कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यास आयुक्तांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे व त्यांच्या कामास सुरूवातही झालेली आहे. ही कृत्रिम विसर्जन तलाव निर्मितीची कामे श्रीगणेशोत्सव सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच पूर्ण असावीत असे निर्देश देत नागरिकांच्या माहितीसाठी या विसर्जन तलावांच्या ठिकाणांची माहिती फ्लेक्स होर्डींगव्दारे तसेच सोशल मिडियाच्या विविध माध्यमांतून नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक स्वरूपात प्रसिध्द करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले.
नवी मुंबई महानगरपालिका व पोलीस विभाग नागरिकांना श्रीगणेशोत्सव उत्साहाने साजरा करता यावा यासाठी सज्ज आहे. तथापि नागरिकांनी सध्याची कोव्हीड 19 परिस्थिती लक्षात घेता आपल्या वर्तनामुळे कोव्हीडच्या तिसर्या लाटेला निमंत्रण तर दिले जात नाही ना? असा प्रश्न स्वत:लाच विचारून स्वयंशिस्तीचा अवलंब करावा आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक अनुरूप वर्तन ठेवावे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे तसेच आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही व आपल्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai