बदल्यांचा ‘चाबुक’ हवेतच विरला
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 19, 2021
- 768
आठवडा उलटुनही अधिकारी जागेवरच
नवी मुंबई ः महापालिकेच्या उपकर विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आल्याने पालिका आयुक्त बांगर यांनी या विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी बदल्यांचा चाबुक ओढला आहे. परंतु, उपकर विभागातील निर्ढावलेले पालिका अधिकारी अजूनही आपल्या खुर्चीला चिकटूनच बसले असल्याने आयुक्तांच्या कारवाईचा चाबुक हवेतच विरल्याची चर्चा पालिकेत सुरु झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या उपकर आणि सेस विभागात हजारो कोटींचा घोटाळा पालिकेच्या अधिकार्यांनी व्यापार्यांचे वार्षिक कर निर्धारण करताना केल्याची तक्रार एका कर्मचार्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच याच विभागातील कनिष्ठ लिपिक यांना एक लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने या विभागातील घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तक्रारीत पालिकेचे काही अधिकारी या विभागात गेली 20 वर्ष काम करत असून त्यांच्या बदल्या हेतुपरस्पर केल्या जात नसल्याचे नमुद करण्यात आले आहे.
विनायक पाटील यांना पकडल्यानंतर आयुक्त बांगर यांनी या विभागातील झाडून 33 अधिकारी व कर्मचार्यांची बदली करण्याचे आदेश 12 नोव्हेंबर रोजी जारी केले. परंतु, कालपर्यंत फक्त एकच अधिकारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू झाले असून अन्य कर्मचारी अजूनही आपल्या मुळ जागेवरच काम करत आहेत. याबाबत उपायुक्त प्रशासन चाबुकस्वार यांच्याकडे चौकशी केली असता संबंधित अधिकारी-कर्मचारी हे दिवाळीची सुट्टी असल्याने गावी गेले असून त्यांना सोमवारपर्यंत मोकळे करण्यास संबंधित विभागप्रमुखास सांगण्यात येईल असे सांगितले. यापुर्वी अशा अनेक विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या जरी दुसर्या विभागात झाल्या असल्या तरी ते मुळ विभागात काम करत असून त्यांचा पगार मात्र बदली झालेल्या विभागातून काढण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर मालमत्ता कर विभाग व लेखा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदलीचे आदेश प्रशासन विभागाकडून निर्गमित झालेले नाहीत. त्यामुळे आयुक्तांच्या कारवाईचा चाबुक हवेत विरवण्यामागे प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य कोण हा सवाल विचारला जात आहे.
- तक्रारदाराचेच कपाट सील
1. पालिकेच्या उपकर विभागात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार ज्या कर्मचार्याने केली त्या तक्रारदाराचेच कपाट सील करण्यात आल्याने महापालिकेच्या कार्यालयात या कारवाईबद्दल उलटसुटल चर्चा सुरु आहे.
2. या उलट तक्रारीत नमुद असलेले अधिकारी राजेंद्र चौगुले आणि सुखदेव येडवे यांच्या नियुक्त्या महत्वाच्या पदांवर केल्याने ‘शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड’ असा अनुभव सध्या पालिका कर्मचारी घेत आहेत.
3. दोन्ही अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai