मंडप परवानगीसाठी ऑनलाईन ई सेवा सुरु

13 गणेशोत्सव मंडळांचे अर्ज दाखल 

नवी मुंबई ः 13 ते 23 सप्टेंबर 2018 या कालावधीत साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाकरिता मंडप उभारणीबाबतच्या परवानगीसाठी मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त  डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ई-सेवा संगणक प्रणाली’ विकसित केली असून 2 महिने आधीपासूनच 13 जुलैपासून कायन्वित करण्यात आली आहे. 

या अनुषंगाने 13 गणेशोत्सव मंडळांनी अर्ज दाखल केले आहेत. मंडप परवानगीशी संबंधित पोलीस, वाहतुक पोलीस, अग्निशमन अशा सर्व प्राधिकरणांचे ना हरकत दाखले, प्रमाणपत्रे या प्रणालीवर दाखल केलेल्या एकाच अर्जाव्दारे उपलब्ध होत असल्याने गणेशोत्सव मंडळांची वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाऊन संपर्क साधण्याची धावपळ या अभिनव प्रणालीमुळे कमी झाली असून मंडळाचे पदाधिकारी समाधान व्यक्त करीत आहेत. डॉ.महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकाच्या अनुषंगाने सार्वजनिक उत्सवाच्या वेळी रस्त्यावर व पदपथावर तात्पुरता मंडप उभारल्यानंतर वाहतूक सुरळीत राहणे व नागरिकांना येण्याजाण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये या संदर्भात उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करावयाची आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ई-सेवा संगणक प्रणाली तयार करुन सादर करण्यात आली आहे. या प्रणालीची कार्यपध्दती अत्यंत सुलभ असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ुुु.पााल.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरील, मुख्य पृष्ठावर, नागरी सेवा सेक्शनमध्ये, मंडप परवानगी करिता सहजपणे अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

मंडळांमार्फत ऑनलाईन दाखल केला जाणारा मंडप परवानगी अर्ज महानगरपालिकेच्या संबंधित विभाग अधिकार्‍यांकडे तसेच त्याच वेळी संबंधित पोलीस ठाणे, संबंधित वाहतूक पोलीस विभाग व संबंधित अग्निशमन अधिकार्‍यांकडे वर्ग होणार आहे. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करुन संबंधित अधिकार्‍यांनी त्यावर निर्णय घेऊन 5 दिवसांच्या कालावधीत ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र दाखल करावयाचे आहे. यासाठी 5 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यास सदरचा अर्ज त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे ऑनलाईन वर्ग केला जाणार आहे. त्यामुळे मंडळांना विहित कालावधीत परवानगी मिळणे सोयीचे ठरणार आहे. गणेशोत्सवाआधी दोन महिन्यापासून म्हणजेच 13 जुलैपासून मंडप परवानगी प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सवाला 10 दिवस राहिले असताना म्हणजेच 2 सप्टेंबरनंतर कुणालाही परवानगी दिली जाणार नाही याची मंडळांनी नोंद घ्यावयाची आहे. तरी या प्रणालीचा मंडप परवानगी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.