लहानग्यांच्या दप्तराचे वजन 4 किलो!

नवी मुंबई : शाळेच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन कमी करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत सीवूड येथील दिल्ली पब्लिक स्कूल व्यवस्थापनाने अवघ्या आठ वर्षाच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे वजन चार किलोपर्यंत ठेवले असल्याची बाब मनसेने निदर्शनास आणली आहे. स्कूल व्यवस्थापाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन शासन निर्णयानुसार करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष सचिन कदम यांनी दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकासह नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शालेय मुलांच्या दप्तराच्या वजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  नवी मुंबई शहरात राज्य शिक्षण मंडळासह सीबीएसई बोर्डाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्त आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावली आहे. अनेक संस्थांनी मराठी माध्यमांच्या शाळा बंद करुन इंग्रजी माध्यमाचे सीबीएसई बोर्डाशी संलग्न वर्ग सुरु केले आहेत. त्यामुळे मराठी मुलांच्या शिक्षणासोबतच मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या नोकर्‍या देखील धोक्यात आल्या आहेत.   राज्य शिक्षण बोर्डाचे कोणत्याही नियमांचे पालन न करता सीबीएसई बोर्डाचे कारण पुढे करत अवघ्या आठ ते दहा वर्षांच्या मुलांवर अभ्यासाचे अधिक ओझे इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून टाकण्यात येत आहे. राज्य शासनाने जुलै 2015 मध्ये घेतलेल्या दप्तराच्या ओझ्याबाबत निर्णयाचे परिपत्रक जून 2017 मध्ये प्रसिध्द करुन त्याची अंमलबजावणी करण्याची सक्ती संस्था चालकांवर करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयात विद्यार्थ्याच्या एकूण वजनापेक्षा दहा टक्के पेक्षा कमी वजनाचे दप्तर असले पाहिजे. मात्र सीवूड्स दिल्ली पब्लिक स्कूलमधील आठ वर्षाच्या विद्यार्थ्यांचे दप्तरांचे वजन हे तब्बल चार किलो असल्याचे आढळून आल्याने मनसेच्या सीवूड्स कमिटीच्यावतीने दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांची भेट घेवून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन शासन निर्णयापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांचे दफ्तराचे वजन हे शासन निर्णयानुसार न झाल्यास मनसे स्टाईलने शाळेविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेद्वारा मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे देण्यात आल्याचे सचिन कदम यांनी सांगितले.