सिडकोच्या घरांची नोंदणी 13 ऑगस्टपासून

नवी मुंबई ः सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत 14, 838 परवडणारी घरे बांधत आहे. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 11 ठिकाणी ही गृहनिर्माण योजना साकार होत आहे. या घरांची ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 ऑगस्ट 2018 रोजी शुभारंभ होणार आहे. 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी असून 2 ऑक्टोबरला याची सोडत निघणार आहे. यात 5 हजार 262 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आहेत. तर 9 हजार 576 सदनिका अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी आहेत. 

शासनाच्या ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणांतर्गत सिडको महामंडळातर्फे 14,838 परवडणार्‍या घरांची ऑनलाईन नोंदणी योजना जाहीर करण्यात आली आहे. सिडकोद्वारे 14 हजार 838 घरकुलांच्या उभारणीचे काम सुरू आहे. ही सर्व घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणार्‍या घरांची योजना व सी.एल.एस.एस. योजनांतर्गत समाविष्ट आहेत. ज्या नागरिकांचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न रू. 25 हजार पर्यंत आहे ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करू शकतात. तर ज्या नागरिकांचे सरासरी मासिक उत्पन्न रू. 25 हजार 001 ते रू. 50 हजार आहे ते अल्प उत्पन्न घटकांसाठी उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करू शकतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील सदनिकांसाठी अर्ज करताना सोबत अनामत रक्कम रू. 5000 व अर्ज शुल्क रू. 280 अशी एकूण रू. 5 हजार 280 रक्कम भरायची आहे. तर अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करताना सोबत अनामत रक्कम रू. 25 हजार व अर्ज शुल्क रू. 280 अशी एकूण रू. 25 हजार 280 रक्कम भरायची आहे.

गृहसंकुल

सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेत तळोजा येथील सेक्टर 27 मध्ये आसावरी गृहसंकुल, सेक्टर 21 मध्ये केदार गृहसंकुल, सेक्टर 22 मध्ये मारवा गृहसंकुल, सेक्टर 29 मध्ये धनश्री गृहसंकुल, खारघर येथील सेक्टर 40 मध्ये बागेश्री गृहसंकुल, कळंबोली येथील सेक्टर 15 मध्ये हंसध्वनी गृहसंकुल, घणसोली येथील सेक्टर 10 मधील भूखंड क्र. 1 वर मालकंस गृहसंकुल, भूखंड क्र. 2 वर मेघमल्हार गृहसंकुल, द्रोणागिरी येथील सेक्टर 11 मध्ये मल्हार गृहसंकुल, सेक्टर 12 मधील भूखंड क्र. 63 वर भूपाळी गृहसंकुल व भूखंड क्र. 68 वर भैरवी ही गृहसंकुले साकारण्यात येत आहेत.

चटई क्षेत्रफळ

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 25.81 चौ.मी. आहे तर अल्प उत्पन्न गटांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 29.82 चौ.मी. आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे 2 हजार 862 सदनिका, खारघर येथे 684 सदनिका, कळंबोली येथे 324 सदनिका, घणसोली येथे 528 सदनिका व द्रोणागिरी येथे 864 सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न घटकांसाठी तळोजा येथे 5 हजार 232, खारघर येथे 1 हजार 260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 व द्रोणागिरी येथे 1 हजार 548 सदनिका उपलब्ध आहेत.

अर्ज नोंदणीची कार्यवाही

सिडकोचे संकेतस्थळ हींींिी://श्रेींींशीू.लळवलेळपवळर.लेा वर योजनेच्या प्रक्रीयेची माहिती शाब्दिक व चलचित्र स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना संकेतस्थळावर 13 ऑगस्ट 2018 पासून सुरू होणार असून प्रत्यक्षात अर्ज नोंदणीची कार्यवाही 15 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार या योजनेत 16 सप्टेंबर 2018 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. तर अनामत रक्कम व अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत 15 ऑगस्ट 2018 ते 17 सप्टेंबर 2018 पर्यंत आहे.

पात्र लाभार्थी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घर प्राप्त झाल्यास एकूण 2.5 लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे तर सी.एल.एस.एस. च्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील घर प्राप्त होणार्‍या लाभार्थ्यांना रू. 2.67 लाख व्याज अनुदान प्राप्त होणार आहे. या महागृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 

आणखीन 25 हजार घरे

त्याचप्रमाणे सिडकोतर्फे आणखीन 25 हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेसंदर्भातील निविदा प्रक्रीया सुरू आहे. सदर निविदा प्रक्रीया पूर्ण करून या वर्षाअखेरपर्यंत ही गृहनिर्माण योजना सिडकोतर्फे जाहीर करणे प्रस्तावित आहे. या गृहनिर्माण योजनेतदेखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प अत्पन्न घटकांसाठी सदनिका उपलब्ध असतील.