Breaking News
सर्व निविदाकारांची उपकरणे एकाच कंपनीची पण दर वेगवेगळे
नवी मुंबई ः महानगरपालिकेने शहरात राबवलेली सीसीटीव्ही प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तांत्रिक सल्लागार निवडीपासून ते ठेकेदार निवडीपर्यंत वादात सापडली असताना या चारही निविदाकारांनी स्पर्धात्मक बोली लावली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चारही निविदाकारांनी एकाच कंपनीची उपकरणे लावणार असल्याचे जरी निविदेत नमुद केले असले तरी दर मात्र वेगवेगळे लावल्याने ही निविदा स्पर्धकांनी कार्टेल करुन भरली असल्याची चर्चा पालिकेत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालिका क्षेत्रात 1469 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सुरुवातीला सल्लागार केपीएमजी यांनी बनवलेल्या अंदाजपत्रकानुसार राबवलेल्या निविदा प्रक्रियेत पालिकेला 271 कोटींचा देकार आला होता. ठेकेदाराने दर कमी करण्यास नकार दिल्याने पालिका आयुक्त बांगर यांनी निविदा रद्द करुन नव्याने निविदा प्रक्रिया राबविली. त्यासाठी त्यांनी नवीन तांत्रिक सल्लागार नेमला व त्यांनी सूचित केलेल्या तांत्रिक तपशीलावर अंदाजपत्रक बनवून नवीन निविदा प्रक्रिया राबविली.
या निविदा प्रक्रियेवर एका वृत्तवाहिनीचे संपादक प्रकाश मोटे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करुन निविदा प्रक्रियेची उच्चस्तरिय चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीत त्यांनी प्रत्येक ओईएम करीता एकापेक्षा अधिक कंपन्यांना पात्र करण्यासाठी तांत्रिक तपशील निविदेत नमुद करणे गरजेचे असताना वेगवेगळ्या उपकरणांसाठी एकच कंपनीची निवड व्हावी या पद्धतीने तांत्रिक अटी व शर्ती ठेवल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. इनडोअर स्वीचेच करीता ज्युनिपर, आयसीसी प्लॅटफॉर्मकरिता श्नायडर इलेक्ट्रिक्स, व्हिडिओ मॅनेजमेंट सोल्यूशनकरिता मिरायसिस, व्हिडीओ वॉलकरिता बार्को तर आयसीसी इन्फ्रास्ट्रक्चरकरिता पायरोटेक या कंपन्यांकडे असलेल्या तांत्रिक बाबींनुसार निविदा बनवून या कंपन्याच पात्र होऊन इतर स्पर्धक बाद होतील असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.
या निविदा प्रक्रियेच्यावेळी अनेक ईच्छुक कंपन्यांनी या प्रकल्पास लागणार्या उपकरणांच्या तांत्रिक तपशीलात बदल करावा अशी मागणी निविदापुर्व बैठकीत केली होती. परंतु, त्यांच्या या मागणीला तांत्रिक सल्लागार व शहर अभियंता विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एनईसी कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि., निल मेटल प्रॉडक्ट्स लि. , टाटा एडव्हान्स सिस्टिम्स लि., तर जाम्पाना कंस्ट्रक्शन्स प्रा. लि या कंपन्यांनी निविदा भरली होती. ही निविदा टाटा एडव्हान्स सिस्टिम्स लि. आणि त्यांचे भागीदार टेक्नोसेस सिक्युरिटी सोल्युशन प्रा. लि. यांना मिळाली आहे. या चारही कंपन्यांनी निविदेमध्ये नमुद केलेली उपकरणे व त्या पुरवणार्या कंपन्या एकच असल्याचे दिसत असून तक्रारदार प्रकाश मोटे यांनी तक्रारीत नमुद केलेल्या उपकरणे व त्या पुरवणार्या कंपन्यांचीच नावे या चारही निविदाकारांनी सारखीच भरली आहेत. याचा अर्थ चारही निविदाकारांना निविदा अटी शर्तीप्रमाणे विशिष्ट कंपनीकडूनच उपकरणांच्या तांत्रिक तपशीलामुळे खरेदी करणे बंधनकारक होते. आश्चर्याची बाब म्हणजे या चारही निविदाकारांनी सारख्याच कंपन्यांची जरी उपकरणे निविदेत नमुद केली असली तरी दर मात्र वेगवेगळे टाकल्याने या चारही निविदाकारांमध्ये स्पर्धा झाली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे