Breaking News
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेत सध्या गाजत असलेल्या सीसीटीव्ही प्रकरणाविरुद्ध संपादक प्रशांत मोटे यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. सदर तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली असल्याची माहिती मोटे यांनी ‘आजची नवी मुंबई’शी बोलताना दिली आहे. लोकायुक्त याप्रकरणी कोणते आदेश देतात याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
‘न्यूज 9 महाराष्ट्र’चे संपादक प्रशांत मोटे यांनी नवी मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या सीसीटीव्ही संनिरिक्षण प्र्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार विभागीय कोकण आयुक्त यांना केली होती. या तक्रारीत कोणत्या उत्पादकांची उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत आणि त्याच उत्पादकांचा तांत्रिक तपशील निविदेत ठेवण्यात आल्याची तक्रार मोटे यांनी केली होती. निविदाप्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मोटे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले असून, त्यांनी नमुद केलेल्या उत्पादक व त्यांची विशिष्ट उपकरणे सर्व स्पर्धकांनी आपल्या तांत्रिक देकारात नमुद केली आहेत. या निविदा प्रक्रियेबाबत विभागीय कोकण आयुक्तांनी महापालिकेकडून अहवाल मागवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे तक्रारदार प्रशांत मोटे यांचे म्हणणे आहे.
प्रशांत मोटे यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे सीसीटीव्ही निविदा प्रक्रियेबाबत तक्रार केली असल्याचे त्यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले. आपल्या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली असून त्याबाबत ते लवकरच चौकशीचे आदेश देतील असे त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे