Breaking News
500 कोटींच्या निविदेसाठी एकच कंपनी ईच्छुक
नवी मुंबई ः महापालिकेच्यावतीने मोरबे धरणाच्या पाणीसाठ्यावर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी मागविलेल्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. यापुर्वी दोनवेळा मागवलेल्या निविदांना कोणताही प्रतिसाद आला नव्हता. आतामात्र आयबीएम सोल्यूशन्स या एकाच कंपनीची निविदा आली असल्याने ती स्विकारावी की फेटाळावी या द्विधा अवस्थेत महापालिका आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्प, 27 जलउंदनच केंद्र, पथदिवे तसेच शाळा, मलनिस्सारण केंद्र यांंच्या कार्यचलनासाठी 80 मेगावॅट विजेची गरज भासत असते. महापालिकेने सौरऊर्जा प्रकल्पातून ही गरज भागविण्याचा प्रयत्न यापुर्वी केला होता. त्यावेळी सौरऊर्जा पॅनल्स धरणाच्या भिंतीवर उभारुन वीज निर्मितीचे धोरण निश्चित केले होते. परंतु, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धरणाच्या सुरक्षिततेचे व प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे करुन सदर प्रकल्प रद्द केला होता. त्यावेळी हा खर्च 200 कोटींच्या घरात होता.
महापालिकेने यावेळी सौरऊर्जा प्रकल्प धरणांच्या भिंतीवर न उभारता तो मोरबे धरणातील पाण्यावर तरंगता प्रकल्प उभारण्याची निविदा प्रक्रिया राबविली आहे. या प्रकल्पातून 100 मेगावॅट विजनिर्मितीचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी 500 एकर क्षेत्रफळ लागणार असून ती गरज मोरबेतील पाण्याच्या विस्तृत क्षेत्रफळातून शक्य असल्याचे सल्लागाराचे म्हणणे आहे. पालिकेने 3 रुपये 36 पैसे प्रति युनिट दराने या प्रकल्पातून निर्माण होणारी विज खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे. सदर प्रकल्प उभारण्याचा प्रति युनिट खर्च साडे चार ते पाच रुपये असल्याने या निविदा प्रक्रियेस म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकल्प पाण्यावर तरंगता असल्याने पाण्याचे बाष्पीभवन खूप कमी प्रमाणात होणार असल्याने जास्त पाणी नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचा दुहेरी फायदा मिळणार आहे. वर्षाला पालिका वीज बिलापोटी 100 कोटींहुन अधिक रुपये एमएसईबीला देत असून त्याची बचत या बीओटीवरील सौरऊर्जा प्रकल्पामुळे होईल तसेच सार्वजनिक वीज वापराची 40 टक्के बचत होणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे