Breaking News
पालिका अधिकारी व स्थानिक नेत्यांच्या साट्यालोट्याने पालिकेचे लाखोंचे नुकसान
नवी मुंबई ः वाशी सेक्टर 30 मधील हॉटेल तुंगा व सेंटर वन जवळील महापालिकेच्या ताब्यातील भूखंडावर अवैध पार्किंग मधून वसूलीचा गोरखधंदा सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. ही वसूली 2018 पासून सुरु असून पालिकेला त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. पालिका अधिकारी व स्थानिक नेते यांचे साटेलोटे असल्याशिवाय हे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. या अवैध वसूलीवर प्रशासनाकडून कारवाईचा चाबुक ओढण्याची मागणी होवू लागली आहे.
वाशी रेल्वे स्थानकाजवळ हॉटेल तुंगा व सेंटर वन मॉलजवळ सिडकोने पार्किंगसाठी भूखंड विकसीत केला आहे. या भूखंडावर गेली अनेकवर्ष कारपार्किंगसाठी वापरण्यात येत होता. सामाजिक कार्यकर्ते संदिप ठाकूर यांनी केलेल्या जनहित याचिकेनंतर सदर भूखंडावर पार्किंग करण्यास मज्जाव करण्यात आला होता. तशाप्रकारची नोटीस सिडकोने त्याठिकाणी लावली होती.
सदर भूखंड सिडकोने नवी मुंबई महापालिकेला 12 सप्टेंबर 2018 रोजी मल्टीलेवल पार्किंग विकसीत करण्यासाठी हस्तांतरीत केला होता. 2018 पासून महापालिकेने हा भूखंड विकसीत करण्यासाठी कोणताही प्र्रयत्न केला नाही. या गोष्टीचा गैरफायदा समाजकंटकांनी घेवून तेथे अवैध पार्किंगचा गोरखधंदा सुरु केला आहे. कार पार्किंगसोबत लहान वाहनांसाठी विकसीत केलेल्या या भुखंडावर सध्या ट्रक, बस, टँकर यासारखी अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत. वाशीतील ट्रकटर्मिनलवर सध्या सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु केले असल्याने तेथील अवजड वाहनांना पार्किंग करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने या जागेचा वापर सध्या त्यांच्याकडून होत आहे. चौबे नावाचा ठेकेदार या वसूलीचा चाबुक संबंधितांवर ओढत असून त्यास पालिका अधिकारी व एका स्थानिक नेत्याचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. वाहनांच्या हतबलतेचा गैरफायदा घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ही अवैध वसूली केली जात आहे. या वसूलीची त्यांना पावतीही दिली जात नसल्याची तक्रार संबंधित वाहनचालकांनी केली आहे.
याबाबत पालिका उपायुक्त मालमत्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अवैध वसूलीच्या प्रकारास दुजोरा दिला आहे. याबाबत कारवाईचे योग्य ते आदेश संबंधित विभाग अधिकारी यांना दिले असल्याचे त्यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले.
सदर भुखंडावर अनधिकृत पार्किंग केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याबाबत वाशी विभाग अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भूखंडावर पार्किंग सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ठेकेदार नेमण्याची निविदा प्रक्रिया पालिकेने सुरु केली आहे. सदर अनधिकृत पार्किंग तत्काळी बंद करण्यात येईल. - दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, मालमत्ता
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे