शहरावर सीसीटीव्हीचा वॉच
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 07, 2023
- 488
नवी मुंबई ः शहर सुरक्षेचे सक्षमीकरण करणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. विविध स्वरुपाचे 1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी बसविण्यात येत असून आत्तापर्यंत 484 कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामधील 19 कॅमेरे प्रायोगिक स्वरुपात कार्यान्वित करण्यात आले असून त्याची तपासणी सुरु आहे.
या प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 540 स्थानांवर प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, नमुंमपा कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेश कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये 954 फिक्स्ड कॅमेरे तसेच 360 अंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणारे 165 पीटीझ़ेड कॅमेरे बसविण्यात येत आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनारा लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने 9 थर्मल कॅमेरे बसविण्यात येत आहेत. याशिवाय पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे 96 इव्हिडन्स कॅमेरे हे 24 मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसविण्यात येत असून 288 एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसविण्यात येत आहेत. या एएनपीआर कॅमेऱ्याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर सिग्नल तोडणाऱ्या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठविले जाणार आहे. यासोबतच 24 ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात येत असून याव्दारे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे.
या सीसीटीव्ही प्रणालीच्या मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारणीचे काम नमुंमपा मुख्यालय येथे सुरू असून हा नियंत्रण कक्ष नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील विशेष कक्षाशी जोडलेला असणार आहे. अशाच प्रकारचा निरीक्षण कक्ष वाहतुक पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 यांचे कार्यालयातही असणार आहे. या सर्व सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाची नियंत्रण कक्षातील संग्रहण क्षमता 30 दिवसांची असणार असून या प्रणालीमध्ये महत्वाच्या प्रसंग, घटना यांचे सीसीटिव्ही चित्रीकरण स्वतंत्रपणे संग्रहण करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
या सीसीटीव्ही प्रणालीच्या कामाबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालय स्तरावरही आढावा बैठक झाली असून त्यामध्ये ही कार्यप्रणाली अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने काही मौल्यवान सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करून ही यंत्रणा अधिक चांगल्या रितीने वापरात आणण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर सकारात्मक असून पोलीस विभागामार्फत करण्यात येणाऱ्या सूचनांची प्राधान्याने अमलबजावणी करणेबाबत आयुक्तानी अभियांत्रिकी विभागास निर्देशित केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai