कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातर्फे सीपीआर प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2023
- 465
नवी मुंबई ः कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईने नवी मुंबईकरांसाठी सीपीआर प्रशिक्षण उपक्रम सुरु केल्याची घोषणा केली आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण शहरातील 1,00,000 लोकांना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीची हृदयक्रिया अचानक बंद पडल्यास सीपीआर देण्याचे प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. सुरुवातीला 1 मार्च ते 31 मार्च 2023 या कालावधीत सीपीआर प्रशिक्षण अभियान चालवले जाईल. कॉर्पोरेट ऑफिसेस, सार्वजनिक जागा आणि कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये देखील प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल.
सामाजिक जबाबदारीचे भान राखून रुग्णालयामार्फत “द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेन” हा उपक्रमाला राबविला जातो. या उपक्रमामध्ये कॉर्पोरेट कर्मचारी, विविध गृहसंकुलांमधील रहिवासी, ऑटो-रिक्षा चालक, पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, नवी मुंबई परिवहन विभागाचे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मॉल्स, रेल्वे स्थानके, सार्वजनिक उद्यानांमधील लोक अशा विविध गटांना सहभागी करून घेतले जाईल. या रुग्णालयाचे, नवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले, हृदय विकारांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 50% मृत्यू हे हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने होतात. अशावेळी इमर्जन्सी सीपीआर किंवा कार्डिओपल्मनरी रिसससिटेशनमुळे व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. सीपीआर हे अत्यावश्यक जीवन कौशल्य आहे आणि ते प्रत्येकाला आत्मसात असलेच पाहिजे. आणीबाणीच्या प्रसंगी मृत्यू होणे टाळण्याची क्षमता या कौशल्यामध्ये आहे. द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेन उपक्रमामुळे नवी मुंबईकरांना आम्ही अशी कौशल्ये प्रदान करू शकू जी आणीबाणीच्या प्रसंगी जीव वाचवण्यासाठी आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असतात.
उपक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे यासाठी हॉस्पिटलने एक टास्क फोर्स तयार केली आहे. सीपीआर प्रशिक्षणातील तज्ञांचा समावेश असलेल्या पाच टीम्स यामध्ये आहेत. इन-हाऊस प्रशिक्षण शिबिरे घेण्यासाठी एक टीम हॉस्पिटलमध्ये तैनात करण्यात येईल. इतर चार टीम्स विविध ठिकाणी जाऊन वयस्कांना सीपीआर देण्याचे प्रशिक्षण देतील तसेच नवजात बाळे व मुलांना सीपीआर देण्याबाबत व्याख्याने देतील. प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या नोंदणीसाठी हॉस्पिटलने एक रजिस्ट्रेशन कमिटी देखील तयार केली आहे. व्यक्तिशः येऊन किंवा ईमेल, दूरध्वनीवरून किंवा ऑनलाईन देखील नोंदणी करता येईल. सर्व प्रशिक्षणार्थींना नीट प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षक, मॅनीकिन्स आणि सत्रांची संख्या पुरेशी राहील याची काळजी देखील ही कमिटी घेईल. द रिव्हाइव्ह लाईफ कॅम्पेनअंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण निःशुल्क आहे. प्रशिक्षणार्थींनी आधी नोंदणी करून आपली जागा राखून ठेवावी असे आवाहन केले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai