लवकरच शहर सीसीटीव्हीच्या कक्षेत
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 21, 2023
- 530
नवी मुंबई ः शहर सुरक्षीततेला बळकटी देणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास सुरुवात झालेली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता संजय देसाई आणि अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या समवेत सीसीटीव्ही प्रणाली मुख्य नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प अधिक परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने मौल्यवान सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शहरभर बसविण्यात येत असून त्याचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर स्थापित करण्यात आला आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 702 विविध प्रकारचे हायडेफिनेशन कॅमेरे बसविण्यात आले असून 63 कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी मुख्य नियंत्रण कक्षाच्या भेटीमध्ये कॅमेरा लावलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही छायाचित्रीकरण बारकाईने पाहिले. हे सर्व कॅमेरे हायडेफिनेशन असून आयुक्तांनी नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्दारे झूम इन व झूम आऊट करून शहरात काही भागात सुरु असलेल्या हालचालींची पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 592 ठिकाणी खाबांकरिता काँक्रिटचा पाया तयार करण्यात आला असून 534 खांब उभारण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी ही सर्व माहिती सविस्तर जाणून घेतली व कोणत्या भागातील कॅमेरे कार्यान्वित झालेले आहेत तसेच कोणत्या भागातील खांब बसवून झालेले आहेत याची विस्तृत माहिती घेतली. या प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 540 स्थानांवर विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून 230 स्थानांवर कॅमेरे बसवून झालेले आहेत. त्यामध्ये शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, नमुंमपा कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेश कॅमेरे बसविण्यात येत आहेत.
या कॅमेऱ्यांमध्ये 954 स्थिर कॅमेऱ्यांचा तसेच 360 अंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणाऱ्या 165 पीटीझ़ेड कॅमेऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनारा लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने 9 थर्मल कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे 96 इव्हिडन्स कॅमेरे हे 24 मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसविण्यात येत असून 288 एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसविण्यात येत आहेत. या एएनपीआर कॅमेऱ्याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार आहे. यासोबतच 24 ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात येत आहेत. या सीसीटीव्ही प्रणालीव्दारे नवी मुंबईच्या शहर सुरक्षिततेचे सक्षमीकरण होणार असून याबाबत पोलीस विभागाशी समन्वय साधून ही प्रणाली अधिक प्रभावीपणे कार्यरत राहण्याच्या दृष्टीने पोलीसांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai