गुजरात हस्तकला उत्सव 2018

नवी मुंबई ः सिडको अर्बन हाट येथे 28 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2018 या कालावधीत सकाळी 11.00 ते रात्री 09.00 या वेळेत गुजरात हस्तकला उत्सव 2018 आयोजित करण्यात आला आहे. आयुक्त व सचिव, कुटीर आणि ग्रामोद्योग विभाग, गुजरात हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. तर इंडेक्स-सी उद्योग भवन, गुजरात यांनी या उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात गुजरातमधील सुमारे 50 कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू व हातमागाची उत्पादने प्रदर्शनार्थ व विक्रीसाठी मांडण्यात येतील. 

गुजरात हस्तकला उत्सव 2018 मध्ये ब्लॉक प्रिंट बंधेज, साड्या, ड्रेस मटेरिअल, हस्तमाग उत्पादने, चामड्याची उत्पादने, मण्यांपासून बनवलेल्या वस्तू, कृत्रिम दागिने इ. उत्पादने प्रदर्शनार्थ मांडण्यात येतील. चनिया चोलीसारखी पारंपरिक वस्त्रे, कच्छी एम्ब्रॉयडरी, मातीची भांडी, तागाची उत्पादने या उत्सवातील मुख्य आकर्षण ठरतील. याशिवाय पडदे, कुशन कव्हर, बेडशीट यांसारख्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूही उपलब्ध असतील. हस्तकला व हस्तमाग उत्पादनांच्या प्रदर्शनाशिवाय या उत्सवात गरबा नृत्य, ऑर्केस्ट्रॉ यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवाच्या कालावधीत शुक्रवार ते रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सायं. 07.00 ते रात्री 09.00 या वेळेत सादर केले जातील. या उत्सवात सिडकोतर्फे विशेष फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. फुड फेस्टिव्हलमध्ये केरळमधील कुटुंबाश्री कॅफेतील 12 महिला कर्मचार्‍यांच्या टीमने तयार केलेले मल्याळी फिश करी, व्हेज व नॉन-व्हेज बिर्याणी यांसारखे पारंपरिक केरळी खाद्यपदार्थ खवय्यांच्या पसंतीस नक्कीच उतरतील. याशिवाय मराठी, गुजराती व राजस्थानी खाद्यपदार्थही फुड फेस्टिव्हलमध्ये असतील. यानंतर सुरू होणार्‍या दसरा महोत्सव व दीप मेळा या कार्यक्रमांसाठीचे बुकिंगही सुरू झाले असून त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी व्यवस्थापक, सिडको अर्बन हाट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.