पालिका सीबीएसई शाळेचे नाव मोठे लक्षण खोटे
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 23, 2023
- 887
वर्षभरापासून शिक्षकांची उणीव असल्याने पालकांचा संताप; शाळेबाहेर प्रवेश बंद आंदोलन
नवी मुंबई ः गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचा तुटवडा जाणवणाऱ्या कोपरखैरणे येथील पालिकेच्या सीबीएसई शाळेत याहीवर्षी अपुरे शिक्षक असल्याने शाळा एक दिवसाआड चालवण्यात येत आहे. वर्षभर केवळ शिक्षक मिळतील अशी आश्वासनांची पाने पुसणाऱ्या पालिकेविरोधात गुरुवारी पालक व विद्यार्थ्यांनी शाळेबाहेरच शाळेत प्रवेश बंद आंदोलन केले. आम्हाला शिकवण्यासाठी शिक्षक द्या अशी विनवणी त्यांनी केली. 26 तारखेला पालिका मुख्यालयातच शाळा भरवली जाणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.
नवी मुंबई महापालिकेने 2018 मध्ये सीवूड्स व कोपरखैरणे येथे 2 सीबीएसई शाळा सुरु केल्या. पण अपुऱ्या शिक्षकांअभावी पालिका चालवत असलेल्या कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेतील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. मागील वर्षभरापासून अपुऱ्या शिक्षक संख्येअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी फक्त आश्वासनच दिले जात असून 1375 विद्यार्थ्यांना फक्त 5 शिक्षक आहेत. त्यामुळे कशीबशी शाळा चालवण्यासाठी पहिली दुसरीचे वर्ग सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी तर तिसरी ते पाचवीचे वर्ग मंगळवार गुरुवार शनिवारी भरवण्यात येत आहे. सहावीचा वर्ग मात्र दररोज शाळेत बोलवण्यात येणार आहे. नव्याने सुरु झालेल्या शैक्षणिक वर्षातही पुरेसे शिक्षक नसल्याने कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळा सोमवारपासून एक दिवसाआड भरण्याची नामुष्की ओढवली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे महापालिका केवळ लवकरच शिक्षक भरती करू असे वारंवार आश्वासन देत आहे. त्यामुळे गुरुवारी अखेर पालकांनी विद्यार्थ्यासमवेत शाळेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केले. विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत प्रवेश करू दिला नाही. तसेच पालिकेने सीबीएसई शाळा सुरु करुन नाव मोठे केले मात्र प्रत्यक्षात वर्ष उलटले तरी लक्षण मात्र खोटे असल्याची प्रतिक्रिया संतप्त काही पालकांनी दिली.
बुधवारी महपालिका आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावले, मात्र भरती प्रक्रिया सुरू आहे. लवकरच शिक्षक मिळतील असे नेहमीचे उत्तर दिले. पालकांनी ठोस लेखी आश्वासन मागितले पण तसे आम्ही देऊ शकत नाही असे सांगितल्याने पालकांनी गुरुवारी मुलांसह शाळेत जात प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले. पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. घोषणा देत सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत ठिय्या मारला. पालिका प्रशासनाने आंदोलन मागे घ्यावे यासाठी बुधवारी रात्री पालिकेच्या इतर शाळेतील सहा शिक्षकांची ऑर्डर काढली. तो कागद दाखवत आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. मात्र ते शिक्षक आहेत कुठे असा सवाल पालकांनी केले. मात्र हे शिक्षक आज हजरच झाले नाहीत. यातील एकही शिक्षक या शाळेत दिवसभर फिरकला नाही. पलिकेविरोधात संताप व्यक्त करताना मुलांचे झालेले नुकसान सांगताना पालकांना अश्रू अनावर झाले होते. मुलेही शिक्षकांची मागणी करीत असताना रडत होते.
शिक्षक भरतीत अडसर
पालिकेने 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी कोपरखैरणे येथे राजकीय हट्टापोटी सीबीएसई शाळा सुरु केली. संबंधितांचा राजकीय हट्ट पालिकेने जरी पुरवला असला तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या अनुषंगाने आवश्यक तेवढी शिक्षक भरती प्रशासनाकडून करुन घेणे संबंधितांची नैतिक जबाबदारी होती. परंतु, 2023-24 चे शैक्षणिक वर्ष सुरु होऊनही शिक्षक भरती न झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
शिक्षक भरतीसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याचे पालिकेकडून जरी सांगण्यात येत असले तरी राजकीय हस्तक्षेपामुळे या भरतीत अडसर निर्माण झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहेे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai