मशिदीच्या निषेधार्थ सानपाडावासी एकवटले

सायन-पनवेल महामार्ग ठप्प ः सिडको प्रशासनाचा निषेध

नवी मुंबई ः स्थानिकांचा विरोध असतानाही सिडकोने सानपाडा येथे मशिदीसाठी भूखंड आरक्षित केला. तसेच त्यावर महापलिकेने बांधकाम परवानगी देऊ करुन काम सुरु केले. मशिदीसाठी आरक्षित केलेला भूखंड रद्द करावा, यासाठी अखिल सानपाडा रहिवासी महासंघाच्यावतीने मंगळवारी सायन-पनवेल महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन आणि मुंडन करून सिडको प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

सिडकोने सानपाडा सेक्टर-8 येथे रहिवासी भागात भूखंड क्रमांक-17 ए मशिदीसाठी दिला आहे. नागरी वसाहतीत मशिद उभारू नये, यासाठी सानपाडा येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. हा विरोध डावलून सिडकोने भूखंड वितरीत केला आणि नवी मुंबई महापालिकेने या भूखंडावर मशिद उभारण्यासाठी बांधकाम परवानगीदेखील दिली आहे. याविरोधात मंगळवारी सकाळी अखिल सानपाडा रहिवासी महासंघाच्या वतीने सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको व ठिय्या आंदोलन केले. बंददरम्यान सानपाडा परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सकाळी दहा वाजता महाआरती करून पाच हजारपेक्षा अधिक स्थानिक रहिवासी शीव-पनवेल महामार्गावर धडकले. याठिकाणी आंदोलकांनी महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक अडवून धरली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत शीव-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच काही नागरिकांनी मुंडन करून सिडको प्रशासनाचा निषेध केला. यावेळी महासंघाच्या वतीने महापालिकेने हा भूखंडावर मशिद उभारण्यासाठी दिलेली परवानगी त्वरित रद्द करावी, माजी पोलिस निरीक्षक एम. एम. पाटील यांची चौकशी करावी, अशा मागण्यांचे निवेदन सिडको व महापालिकेला देण्यात आले. यानंतरदेखील सिडकोने भूखंड रद्द करण्याची कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे अखिल सानपाडा रहिवासी महसंघाचे सरचिटणीस घनश्याम पाटे यांनी सांगितले. आंदोलकांनी पोलीस, तसेच महापालिकेलाही निवेदन देऊन मशिदीला दिलेला भुखंड रद्द करण्याची मागणी केली.