Breaking News
खास कर्मचाऱ्यांना पुन्हा मालमत्ता व एलबीटी विभाग
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी 150 कर्मचाऱ्यांची पदोन्नतीने पदस्थापना तर 159 कर्मचाऱ्यांच्या नियमीत बदल्या केल्या आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्याचा ढोल प्रशासन बडवत असले तरी ठराविक कर्मचाऱ्यांना मात्र मालमत्ता व एलबीटी विभागात परत आणल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई पालिकेत नगररचना, शहर अभियंता, मालमत्ता व एलबीटी हे चार विभाग मलाईदार विभाग म्हणून ओळखले जातात. या विभागात बदली व्हावी म्हणून कर्मचारी धडपडत असतात, तर काही कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या औदार्यामुळे वर्षानुवर्ष तेथेच राहण्याचे भाग्य लाभते. असे अनेक कर्मचारी गेली सात ते आठ वर्षे मालमत्ता व एलबीटी विभागात ठाण मांडून बसले होते. एलबीटी विभागातील कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यावर तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या होत्या. सदर बदल्या होऊन वर्ष उलटून गेले असतानाच पुन्हा एकदा विद्यमान आयुक्त नार्वेकर यांनी अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीने पदस्थापना व नियमीत स्वरुपात बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये एलबीटी व मालमत्ता विभागात पुर्वी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात नियुक्ती दिल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत. या बदल्यांमागे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आग्रही असल्याने हा बदलीचा ढोल वाजवला गेल्याची चर्चा पालिकेत आहे. या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप असून फक्त ठाणेदारांशी जवळीक असल्याने त्यांनाही मुदतवाढ मिळत असल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई अलर्ट सिटीझन फोरमने या बदल्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला असून त्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी अनेक महत्वाच्या सूचना केल्या आहेत. पालिकेने संकेतस्थळावर डॅशबोर्ड सुरु करुन तो जनतेसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्याने नियुक्तीपासून कोणकोणत्या विभागात किती वर्ष काम केले याची संपुर्ण माहिती संकेतस्थळावर देण्याची मागणी केली आहे. एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम केल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या लागेबंधाने अर्थपुर्ण गैरव्यवहार होण्याची शक्यता सदर फोरमने वर्तवली आहे. यापुढे सर्व बदल्या लॉटरी पद्घतीने करण्याची सूचनाही त्यांनी आयुक्तांना केली आहे. आयुक्त नार्वेकर त्यावर कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे