Breaking News
गावडे कुटुंबियांनी चार गाळे हडपल्याचे लेखापरिक्षणात उघड
नवी मुंबई ः नेरुळ येथील श्री गणेश को. हौ. सोसायटीच्या लेखा- परिक्षणातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष अशोक गावडे व त्यांच्या कुटुंबियांनी अल्पिक फायनान्स लि. या कंपनीचे चार गाळे विना मोबदला स्वतःच्या नावाने हस्तांतरीत केल्याचा आक्षेप विशेष लेखापरिक्षक ठाणे यांनी केला आहे. हे हस्तांतरण बेकायदेशीर कुलमुखत्यार पत्राच्या आधारे केल्याचा निष्कर्ष या अहवालात आहे. या अहवालामुळे खळबळ माजली असून संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक सदस्यांनी केली आहे.
नेरुळ सेक्टर 28 येथील भुखंड क्र. 1 वर बांधण्यात आलेल्या श्री गणेश को. ऑप. हौ. सोसायटी लि. चा विशेष लेखा परिक्षण अहवाल आजची नवी मुंबईच्या हाती लागला आहे. या अहवालात संस्था स्थापनेपासून ते 2015 सालापर्यंत संस्थेचे पदाधिकारी म्हणून कामकाज पाहणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांवर संगनमताने दफ्तरामध्ये फेरफार करुन, बोगस कागदपत्रे तयार करुन, दफ्तरामध्ये खाडाखोड करुन, बनावट व खोटी माहिती देवून चुकीचे व खोटे हिशोब नोंदवणे, गैरपद्धतीने मालमत्ता हस्तांतरण करणे, शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवणे त्याचबरोबर अधिकार व पदाचा गैरवापर करुन फसवणुक, विश्वासघाताने संस्थेचे व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याने कायदेशीर बाबीस पात्र असल्याचे गंभीर आक्षेप त्यात नोंदविले आहेत. वरील रक्कम संबंधितांकडून वसूल पात्र असल्याने संबंधितांना खुलासा करण्यास सांगण्यात आला आहे.
वरील लेखा परिक्षण अहवालात अध्यक्ष अशोक गावडे व त्यांच्या कुटुंबियांनी अल्पिक फायनान्स लि. चे स्वतः व कुटुंबियांच्या नावाने चार तर संस्थेच्या नावाने दोन गाळे हस्तांतरीत केल्याची नोंद केली आहे. अल्पिक फायनान्स लि. यांच्याकडे संस्थेची 15 लाख 43 हजार 358 रु. थकबाकी होती. ही थकबाकी वसूल न करता आणि थकबाकी वसूलीसाठी संबंधित कंपनीविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये कारवाई न करता गाळा क्र. 7 व 21 निर्मला अशोक गावडे तर गाळा क्र. 8 अशोक गावडे व गाळा क्र. 20 स्वप्ना गावडे यांच्या नावाने 1993 ते 2008 या कालावधीत हस्तांतरीत करण्यात आल्याचे अहवालात नमुद केले आहे. हे हस्तांतरण करण्यासाठी फायनान्स कंपनीचे कर्मचारी प्रदीप रघुनाथ गावडे यांच्या नावाने नोटराईज पद्धतीने कुलमुखत्यारपत्र बनविण्यात आले. कुलमुखत्यारपत्र करुन देणाऱ्याचे ओळखीबाबतची म्हणजेच कंपनीचा ठराव, अधिकार पत्र, कुलमुखत्यारपत्र करुन देणाऱ्याचा फोटो तसेच कुलमुखत्यारपोटी मोबदल्याची रक्कम नमुद केले नसल्याचा गंभीर आक्षेप या अहवालात आहे. मालमत्ता संस्थेच्या नावाने करताना ती नोंदणीकृत न करता स्टँम्प पेपरवर कराराने केली असून चेअरमन व त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने हस्तांतरण मात्र नोंदणीकृत खरेदी खताने झाल्याचे अहवालात नोंदवले आहे. हस्तांतरण करताना कोणतीही बाकी नाही व हस्तांतरणास हरकत नसल्याचे संस्थेचा दाखला या व्यवहारास घेतला नसल्याचे लेखापरिक्षकाने नमुद केले आहे.
हा मोबदला रोखीने दिल्याचे सांगण्यात आले असून मात्र कुलमुखत्यारधारक प्रदिप गावडे यांनी कोणताही मोबदला मिळाला नसल्याचे रुजवातीत सांगितल्याचे लेखापरिक्षकाने नमुद केले आहे. अल्पिक फायनान्स लि. या कंपनीचा पत्ता, संचालकांची नावे, संपर्क क्र. याबाबतची कोणतीही माहिती कुलमुखत्यारधारकाकडे नसल्याचे निदर्शनास आल्याचे आक्षेप अहवालात आहेत. अल्पिक फायनान्स लि. यांच्या मालमत्ता हस्तांतरणामध्ये गंभीर गैरप्रकार होऊन संस्थेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे तसेच संगनमताने संस्थेची व सभासदांची विश्वासघात करुन फसवणुक केल्याची गंभीर आक्षेप लेखापरिक्षकाने नोंदवल्याने अध्यक्ष अशोक गावडे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. या आरोपांना अध्यक्ष गावडे व पदाधिकारी काय उत्तर देतात याकडे आता श्री. गणेश को. ऑप हौ. सोसायटीच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे