Breaking News
पोह्यांच्या नऊ वेगवेगळ्या प्रकारांची मेजवानी एकाच ठिकाणी
सुदाम्याने आपल्या प्रिय मित्राला म्हणजे भगवान श्रीकृष्णांना भेटायला जाताना घेऊन गेलेले पोहे भगवंताने आवडीने खावे असा इतिहास असणाऱ्या पोह्याला प्राचीन काळापासूनच खाद्यपदार्थांमध्ये एक विशिष्ट स्थान आहे.नाश्त्या म्हटले की अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात. परंतु सर्वसामान्यांच्या नाश्ता पोह्याशिवाय पूर्ण होत नाही. पोहे म्हटले की नाश्ता आणि नाश्ता म्हटलं की पोहे हे जणु अघोषित समीकरणच. आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ अनेकांच्या लग्नाच्या गाठी जुळवण्यासाठी निमित्त मात्र का होईना पण लागतोच. बहुतांश घरामध्ये नाश्त्याल्याच नव्हे तर मधल्या वेळेतली छोटीशी भूख भागवण्यासाठीही पोह्याची प्लेट समोर येते. पचायला हलका आरोग्यदायी आणि बनवायला सोपा असणारा हा पदार्थ महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये आवडीने खाल्ला जातो.
अशा या पोह्याचे नऊ वेगवेगळे प्रकार आपल्याला खायला मिळतात ते 'सुदामाचे पोहे' या छोटेखानी हॉटेलमध्ये. वाशी-कोपरखैरणे मुख्य रस्त्यावर सेक्टर 18, कोपरखैरणे येथे गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे हॉटेल अल्पावधीतच प्रसिद्धीस आले आहे.
सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत ग्राहकांच्या सेवेत असणाऱ्या या हॉटेलमध्ये सुमारे 9 जणांचा कर्मचारी वर्ग असून दिवसभरात सुमारे 1000 ते 1100 ग्राहक येत असल्याचे हॉटेलचे मालक संदेश बाबासाहेब भोसले यांनी सांगितले.
या ठिकाणी नऊ प्रकारचे पोहे खायला मिळतात. पोहे बनवण्याची विशिष्ट पद्धत असून प्रत्येक प्रकाराची एक वेगळीच चव आहे. सर्वात जास्त मागणी असलेल्या तर्री पोहे पाठोपाठ इंदोरी पोहेही ग्राहकांच्या मनाचा ठाव घेतात. या व्यतिरिक्त इथे कांदा पोहे, मटकी पोहे, खोबरे पोहे, कोकणी पोहे, दडपे पोहे, दही पोहे तसेच कुरकुरीत पोहे मिळतात. तसेच इथला पोहे मिसळ पाव आणि चहा सुद्धा खवय्यांच्या आवडीचा बनला आहे. तर्री पोह्यामध्ये शेव आणि तर्रीचा वापर केला जातो. तर इंदोरी पोह्यात जीरा मसाला, लाल बुंदी, डाळिंब व जाड रतलामी शेव पोह्यांवर टाकली जाते त्यामुळे त्याची चव खाणाऱ्याच्या मनाला भुरळ घालते.
सुरुवातीला काही महिने रेस्टॉरंट चालवल्यानंतर लोकांना काहीतरी वेगळे स्वादिष्ट, आरोग्यदायी द्यावे या भावनेने संदेश भोसले, त्यांचे वडील बाबासाहेब भोसले व त्यांची आई ज्योती भोसले यांनी 'सुदामाचे पोहे' ही संकल्पना अस्तित्वात आणली. पुण्यामध्ये 2019 साली सुरू झालेले 'सुदामाचे पोहे' हा आता एक ब्रँड बनला आहे. आत्तापर्यंत त्यांची 33 केंद्रे सुरू झाली असून खवय्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. इथे येणारे ग्राहकच या ठिकाणची प्रसिद्धी करत असतात. सोशल मीडियावर सुद्धा हळूहळू 'सुदामाचे पोहे' चा प्रभाव वाढत असल्याचे जाणवते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे