अनधिकृत इमारतींवर अद्याप कारवाई नाही

नवी मुंबई ः बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे 2013 ते 2015 या कालावधीत कोपरखैरणे व ऐरोली विभागात नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेऊन उभ्या राहिलेल्या इमारतींवर कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित विभाग अधिकार्‍यांकडून झाली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये कोपरखैरणेतील 4 व ऐरोलीतील 3 इमारतींचा समावेश असून आयुक्तांनी संबंधित आदेश देऊनही ही कारवाई न झाल्याने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

बनावट व बोगस कागदपत्रांच्या आधारे कोपरखैरणे येथील सेक्टर 11 मधील भूखंड क्र. 114, 127 ते 132 तर सेक्टर 4 अ मधील भुखंड क्र. 133 ते 138 व 35 आणि 16 या भुखंडांवर तळमजला अधिक चार मजले असे बांधकाम करण्यात आले होते. ऐरोलीतील सेक्टर 20ब मध्ये भुखंड क्र. 52, 53/5, तर सेक्टर 9ई मध्ये भुखंड क्र. 7 वर तळमजला अधिक चारमजले असे बेकायदा बांधकाम करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार सिडकोला प्राप्त झाल्यावर त्यांच्या मुख्य भुमी व भूमापन अधिकार्‍यांनी नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागास संबंधित इमारतींचे बांधकाम परवानगी रद्द करण्याचे कळवून कोपरखैरणे व ऐरोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. सिडकोचे वरील पत्र प्राप्त झाल्यानंतर सहायक संचालक नगररचना सुनील हजारे यांनी संबंधित विकसकाला नोटीस देऊन याबाबतची सुनावणी घेतली. सूनावणी दरम्यान संबंधित वास्तुविशारद व विकसकाने सिडकोने घेतलेल्या आक्षेपांवर योग्य तो खुलासा न केल्याने दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द करुन सदर बांधकाम बेकायदेशीर व अनधिकृत ठरवून उपआयुक्त व नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) यांना संबंधित इमारतीवर कार्यवाहीचे आदेश 2016 सालीच दिले होते. सदर आदेश पारित होऊन दोन वर्षे उलटून गेल्यावरही पालिकेच्या विभाग अधिकार्‍यांकडून या इमारतींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. याबाबत स्थायी समिती सदस्य नामदेव भगत यांनी माहिती मागितली असता त्यांना ही माहिती नगररचना विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आली. याविषयी विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी अधिक माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले.