नवी मुंबई भाजपवर नाईकांचीच पकड
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 04, 2023
- 688
संदीप नाईक यांना जिल्हाध्यक्षपद देवून सूचक इशारा
नवी मुंबई ः येत्या वर्षभरात महापालिका, लोकसभा व राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. त्यादृष्टीने नवी मुंबईवर राजकीय पकड असणाऱ्या गणेश नाईकांचे राजकीय वारस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप नाईकांकडे नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद भाजपने देवून त्यांच्यावर आगामी तिनही निवडणुकांची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या माध्यमातून नवी मुंबई भाजपची धुरा संदीप नाईकांकडे दिल्याने पक्षांतर्गत विरोधकांना सूचक इशारा पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्षपद माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांनी सोपवले आहे. यापुर्वी पाच वर्ष हे पद माजी नगरसेवक रामचंद्र घरत यांच्याकडे देण्यात आले होते. घरत यांचा राजकीय वकूब फक्त तुर्भे गावापुरता मर्यादित असल्याने वर्षभरात होणाऱ्या देश व राज्यातील महत्वाच्या निवडणुकांसाठी भाजपला सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज होती. यावेळी रामचंद्र घरतांसह आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या गटातील महामंत्री डॉ. राजेश पाटील हेही जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा होती. परंतु, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षपद संदीप नाईक यांच्याकडे सोपवून नाईक घराण्याचे नवी मुंबईतील राजकीय महत्व अधोरेखीत केले आहे.
नवी मुंबई भाजपामध्ये मंदाताई म्हात्रे व गणेश नाईक गट यांच्यात शीतयुद्ध असल्याचे बोलले जाते. नवी मुंबई महापालिकेची निवडणुक नोव्हेंबर दरम्यान असून नवी मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातात असणे गरजेचे आहे. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ते शक्य असल्याने भाजप श्रेष्ठींनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे नाईक गटातील ईच्छुक उमेदवारांना योग्य तो संदेश मिळाला आहे. त्यामुळे विरोधी गटातील ईच्छुकांना जुळवून घेण्यास योग्य वेळ पक्षाने दिल्याची चर्चा आहे.
- संदीप नाईकांचे पुनर्वसन?
एका घरात एक तिकीट असे धोरण भारतीय जनता पक्षाचे असून मागील निवडणुकीत गणेश नाईकांऐवजी संदीप नाईकांना ऐरोली मतदार संघातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी संदीप नाईक यांनी माघार घेवून आपली उमेदवारी आपले वडील गणेश नाईक यांना दिली होती. परंतु, याही वेळेस विधानसभा निवडणुकीत एकच तिकीट देण्याचा निर्णय झाल्यास जिल्हाध्यक्षपद नाईक घराण्याकडे आल्याने त्यांना प्रखर विरोध करणे अशक्य होईल. त्यामुळ भाजपने संदीप नाईकांचे प्रत्यक्षपणे पुनर्वसन केल्याचे बोलले जात आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai