Breaking News
पालिकेचे दुर्लक्ष ; स्वच्छ अभियानाचा उडाला फज्जा
नवी मुंबई : नवी मुंबई शहराचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावरील पुलाखाली कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या परिसराला पूरती अवकळा आली आहे.
पामबीच मार्ग हा वाशी ते बेलापूरला सानपाडा व नेरूळ मार्गे जोडणारा मुंबई हार्बरला समांतर 10 किलोमीटरचा रस्ता आहे. शहरातील इतर रस्त्यांच्या तुलनेत उत्तम दर्जा व निसर्ग सौंदर्याने संपन्न असल्यामुळे पाम बीच रोडला वेगळे महत्त्व आहे. तसेच या मार्गावर कमी रहदारी असल्यामुळे कमी वेळात वाशी ते बेलापूर अंतर पार करता येते. या मार्गावर वाशीहून सानपाड्याकडे जाताना ओवर ब्रिज पार करावा लागतो. या पुलाखाली प्लास्टिक तसेच घनकचऱ्याचे प्रचंड साम्राज्य असून या ठिकाणी स्वच्छता केली जात नाही. आसपासच्या नागरिकांकडून या ठिकाणी डेब्रिज, कपडे, फर्निचरचे सामान, प्लास्टिक टाकले जात आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे 'स्वच्छ नवी मुंबई' मोहिमेचा या ठिकाणी फज्जा उडालेला दिसतो. संबंधितांनी लवकरात लवकर याकडे लक्ष घालून हा परिसर स्वच्छ करावा व त्यास दोन्ही बाजूंनी तारेचे कंपाउंड करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
डेब्रिज असल्यास ते हटवून या ठिकाणी डेब्रिज विरोधी पथकाद्वारे नियंत्रण ठेवले जाईल. तसेच या जागेचे सुशोभीकरण केले जाईल. ही जागा नागरिकांच्या उपयोगात आणण्यासाठी अभियांत्रिकी विभागाशी समन्वय साधून योग्य ती कारवाई करता येईल. - बाबासाहेब राजाळे, उपायुक्त, घनकचरा विभाग, नवी मुंबई महानगरपालिका
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे