Breaking News
राज ठाकरे यांच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष
नवी मुंबई ः दहा वर्षानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टोलच्या वसूलीबाबत आवाज उठवून खळखट्याकचा इशारा राज्य सरकारला दिला होता. ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिकांनी मुंबई एन्ट्री पॉईंटवर वाहने मोजणी सुरु करुन त्याचा अहवाल पक्षप्रमुखांना सादर केला. परंतु या अहवालावर अद्यापपर्यंत त्यांनी चुप्पी साधल्याने टोलच्या झोलचे ‘राज' कधी उलगडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
2014 साली मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील विविध टोलच्या माध्यमातून सुरु असलेली जनतेची लूट थांबवण्यासाठी मोठे आंदोलन उभारले होते. या आंदोलनादरम्यान मनसैनिकांनी राज्यातील विविध टोल नाक्यांवर वाहन मोजणी करुन त्याचा अहवाल ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर ठाकरे यांनी टोल का झोल या शिर्षकाखाली आंदोलन उभारुन राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. त्यामध्ये मुंबई एन्ट्री पॉईंट, मुंबई-पुणे महामार्गावरील खारघर व सोमटणे येथील टोलनाके तसेच राज्यातील अनेक टोलनाक्यांचा समावेश होता. शिवसेना-भाजप युतीनेही त्यावेळी सरकार सत्तेत आल्यास राज्य टोलमुक्त करुन असे आश्वासन जनतेला दिले होते. या टोलच्या वसुलीबाबत जनहित याचिका दाखल केल्याचे राज ठाकरे यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले होते. परंतु, या आंदोलनाचे फलित काय याबाबत मात्र राज्यातील जनता अनभिज्ञ राहिली.
सत्ता बदलानंतर फडणवीस सरकारने राज्यातील महत्वाचे टोलनाके बंद केले असून मुंबई-पुणे एक्सप्रेस आणि मुंबई एन्ट्री पाईंटवरील टोल वसूली अद्यापही सुरु आहे. दहा वर्षानंतर पुन्हा एकदा राज यांनी टोल का झोल या विषयाला हात घातला असून याबाबत राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा ऑक्टोबरमध्ये दिला होता. पुन्हा एकदा मनसैनिकांनी नवी मुंबई मनसे प्रमुख गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई एन्ट्रीच्या पाच टोलनाक्यांवर महिनाभर वाहनांची मोजदाद केली असून त्याचा अहवाल राज ठाकरे यांना सादर केला आहे. दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृहात या विषयावर भेट घेतली. परंतु, या भेटीतील तपशील गुलदस्त्यात असून टोलबाबत राज ठाकरे यांच्या भुमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई मनसे प्रमुख गजानन काळे यांच्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सदर अहवाल ठाकरे यांना सादर केला असून ते दिवाळीनंतर या विषयावर पत्रकार परिषद घेवून बोलतील असे सांगितले. योग्यवेळी हा अहवाल जनतेसमोर खुला केला जाईल असे त्यांनी ‘आजची नवी मुंबई'शी बोलताना सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे